लागण दरात घट, ५५ वरून २५ टक्कय़ांवर

वसई : वसई-विरार शहरात रुग्णांचा लागण दर (पॉझिटिव्हिटी रेट) सर्वाधिक असल्याने परिस्थिती गंभीर बनली होती. एप्रिल महिन्यात हा दर ५५ टक्के  एवढा होता. मात्र चालू मे महिन्यात या लागण दरात कपात होऊन तो ५५ टक्कय़ांवरून २५ टक्कय़ांवर आला आहे.

करोनाचा दुसऱ्या लाटेचा मोठा फटका वसई-विरार शहराला बसला आहे. एप्रिल महिन्यात शहरात मोठय़ा संख्येने करोनाबाधित रुग्ण आढळून आले होते. त्यामुळे शहरातील चिंता अधिकच वाढली होती. वसई-विरार महापलिकेच्या दोन रुग्णांलयांसह २१ नागरी प्राथमिक आरोग्य केंद्रांमध्ये करोनाच्या चाचण्या केल्या जातात. या ठिकाणी आरटीपीसीआर आणि प्रतिजन चाचण्या करण्यात येतात. दिवसाला सरासरी एक हजाराच्या आसपास चाचण्या होत आहेत. त्यात रुग्ण सकारात्मक निघण्याचे प्रमाणे हे ५५ टक्कय़ांपेक्षा अधिक असल्याचे पालिकेने सांगितले होते.  परंतु मे महिन्यात सकारात्मक आढळून येणाऱ्या रुग्णांची टक्केवारी अर्थात लागणदर हा २५ टक्कय़ांवर आला आहे. म्हणजेच मागील महिन्यांच्या तुलनेत सकारात्मक रुग्णांची टक्केवारी ५० टक्कय़ांनी घटली आहे. ३ मे ते ९ मे या मागील सात दिवसात वसई-विरार शहरात १७  हजार ९७० इतक्या करोना चाचण्या करण्यात आल्या आहेत. यातील चार हजार ६४३ चाचण्यांचे अहवाल हे सकारात्मक आढळून आले आहेत. म्हणजेच चाचण्यांच्या आकडेवारीत २५.८३ टक्के इतकेच रुग्ण सकारात्मक झाले असल्याचे दिसून आले.

चाचण्या वाढवल्या

ल्ल एप्रिल महिन्यात पालिकेच्या क्षेत्रात सरासरी बाराशे ते पंधराशे इतक्या करोना चाचण्या केल्या जात होत्या. यातील ५५ ते ६० टक्के  चाचण्या या सकारात्मक येत होत्या.  परंतु मे महिन्याची सुरुवात होताच करोनाबाधित रुग्णांचे निदान लवकर करता यावे यासाठी चाचण्याची संख्या ही दोन ते अडीच पटीने वाढविली आहे. आता दिवसाला साधारणपणे अठराशे ते चार हजारांपर्यंत चाचण्या होत आहेत. आठवडाभरातच त्याचा सकारात्मक परिणाम हा दिसून येऊ लागला आहे.

ल्ल मागील वर्षांंपासून पालिकेने आतापर्यंत (९ मे २०२१ पर्यंत) दोन लाख ८१ हजार १८५ नागरिकांच्या  चाचण्या केल्या. त्यापैकी ६० हजार ०३२ रुग्ण हे करोनाबाधीत आढळले. यातील एक हजार १९६ रुग्णांचा मृत्यू झाला आहे तर ४७  हजार ३३७ रुग्णांनी करोनावर मात केली आहे.

वसईतील केंद्रांवर लसीकरणासाठी लागलेली रांग.