कल्पेश भोईर

वसई विरार शहरातील वीज माफियांनी चोरीचा उच्छाद मांडला असून त्याचा मोठा आर्थिक फटका महावितरणाला बसत आहे. दर महिन्याला या वीज माफियांकडून तब्बल १० कोटींहून अधिक रुपये वीज युनिटची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.

वसई महावितरण विभागात एकूण आठ लाख ५६ हजार इतके वीजग्राहक आहेत. परंतु अनेक भागांत वीजचोरीचे प्रकार घडत आहेत. अनधिकृतपणे वीज पुरविणारे माफिया शहरात सक्रिय आहेत. मीटरमध्ये फेरफार करून व छुप्या मार्गाने विद्युत वाहिन्यांवर आकडे टाकून हे माफिया वीजपुरवठा करत असतात. त्याचा मोठा आर्थिक फटका महावितरणाला बसत आहे. वसई विरार शहरासाठी महावितरणातर्फे ३१५ कोटी युनिट इतकी वीज खरेदी केली जात आहे. त्यातील २६८ कोटी युनिट इतकी वीज वर्षांला ग्राहकांना विक्री केली जात आहे.

मात्र या वीजचोरीमुळे दर महिन्याला १५ ते २० टक्के इतका तोटा सहन करावा लागत आहे. त्यामध्ये ७ टक्के तोटा हा वीजचोरीच्या स्वरूपातील आहे. म्हणजे महिन्याकाठी दहा कोटींहून अधिक रुपये इतक्या रकमेच्या युनिटची चोरी होत असल्याचे उघड झाले आहे.

ही वीजचोरी रोखण्यासाठी महावितरणने कंबर कसली आहे. यासाठी वीजचोरीचे वाढते प्रमाण रोखण्यासाठी महावितरणने वीजचोरी नियंत्रण पथके  तयार केली आहेत. त्या पथकांनी मागील तीन महिन्यांत पाचशेहून अधिक वीजचोरीचे प्रकार उघडकीस आणून कारवाई केली आहे. या कारवाईच्या माध्यमातून १ कोटी ७५ लाख रुपये इतक्या दंडाची वसुली करण्यात आली आहे. यामध्ये करण्यात येणारी वीजचोरी नालासोपारा येथील संतोष भुवन, धानीव तर नायगाव पूर्वेतील भागात जास्त प्रमाणात असल्याची माहिती महावितरणने दिली आहे.

वितरण व्यवस्था अधिक सक्षम करण्यात येत आहे. तसेच वीजचोरीमुळे होणारे नुकसान टाळण्यासाठी महावितरण विभागाच्या अधिकारी व कर्मचारी यांना सूचना देऊन वीजचोरांवर कारवाई सुरू करण्यात आली आहे.

-रफीफ शेख, मुख्य अभियंता, कल्याण महावितरण परिमंडळ