जीवरक्षकांसाठीच्या मनोऱ्यांवर पर्यटक

वसई तालुक्यातील विविध समुद्रकिनाऱ्यांवर पर्यटकांचा ओघ वाढत असला तरी या ठिकाणी जीवरक्षक नसल्याचे दिसून येत आहे. समुद्रात होणाऱ्या दुर्घटनांमध्ये वाढ होत असून अनेक किनाऱ्यांवर जीवरक्षक तैनात नसल्याच्या तक्रारी पर्यटकांकडून करण्यात आल्या आहेत.

वसई-विरारमधील समुद्र किनारे पर्यटकांना नेहमी खुणावत असतात. येथील निसर्गरम्य परिसर, शांत आणि विस्तिर्ण किनारे आणि रिसॉर्टमुळे दिवसेंदिवस पर्यटकांचा ओघ विविध किनाऱ्यांवर वाढत आहे. मात्र पर्यटकांचे समुद्रात बुडून मृत्यूमुखी पडण्याचे प्रमाणही वाढत आहे. अर्नाळा, कळंब, राजोडी आदी किनारे धोकादायक ठरत आहे. या किनाऱ्यांवर जीवरक्षक नसल्याने बुडणाऱ्या पर्यटकांना वाचवता येत नसल्याची तक्रार पर्यटक करत आहे. नावापूर, भुईगाव याठिकाणी अजून जीवरक्षक नेमलेले नाही. पण ज्याठिकाणी जीवरक्षक नेमले आहेत, त्या ठिकाणी कोणी बसत नाही, असे पर्यटक सांगतात. जीवरक्षकांना टेहळणी करण्यासाठी असलेले मनोरे रिकामे असतात. या ठिकाणी अनेकदा पर्यटकच बसलेले दिसून येतात. वसईतील विविध समुद्रकिनाऱ्यांवर बेकायदा रेतीउपसा होत असते. त्यामुळे किनाऱ्याचा भाग खोलगट झालेला आहे. याची कल्पना अनेक पर्यटकांना नसल्याने दुर्घटनांमध्ये वाढ होत आहे. त्यामुळे येथे जीवरक्षक असणे गरजेचे आहे.

जीवरक्षक असले तरी पर्यटक त्यांच्या सुचनांकडे दुर्लक्ष करून खोल समुद्रात जातात, असे ग्रामस्थ सांगतात. अनेक जण मद्यप्राशन करून आलेले असतात. त्यामुळे समुद्राच्या पाण्यात गेल्यावर त्यांचा तोल जातो आणि मृत्यू होतो, असे अर्नाळा ग्रामस्थांनी सांगितले

जीवरक्षक नेमलेले आहेत. अनेक ठिकाणी ते कर्तव्यावर असतात. समुद्रकिनारी बळी जाण्याचा आणि जीवरक्षकाचा काही संबंध नाही. अपघाताची दुसरी कारणेही असू शकतात. त्यामुळे जीवरक्षकांना चुकीचे ठरवणे योग्य नाही.

– विजयकांत सागर, तिरिक्त पोलीस अधीक्षक