वसई-विरार शहरात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला असून  आता पालिकेकडे केवळ ३ दिवस पुरेल एवढाच प्राणवायू शिल्लक आहे. दुसरीकडे प्राणवायूचा काळा बाजार होत असल्याची शक्यता खुद्द पालिकेने वर्तवली आहे.

वसई-विरार शहरात मोठ्या प्रमाणावर प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाला आहे. सोमवारी खासगी रुग्णालयात प्राणवायूचा तुटवडा निर्माण झाल्याने हाहाकार उडाला होता. त्यामुळे पालिकेने इतर ठिकाणांहून प्राणवायू मिळविण्यासाठी धडपड सुरू केली आहे. वसई आणि पालघर जिल्ह््यात  मोठ्या प्रमाणावर औद्योगिक क्षेत्र आहे. या ठिकाणी प्राणवायू लागत असतो. रुग्णांना लागणारा प्राणवायू औद्योगिक क्षेत्राकडे वळवला जात असल्याची शक्यता पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी व्यक्त केली आहे. उद्योगांना लागणारा प्राणवायू रोखण्यासाठी प्रयत्ना केला जाणार असल्याचे त्यांनी सांगितले. वसईत गॅलेक्सी आणि स्पीड या दोन प्राणवायू रिफिलिंग करणाऱ्या कंपन्या आहेत. वैद्यकीय परवान्यावर  प्राणवायू पुरवला जात असतो. मात्र वैद्यकीय परवान्यावर दिला जाणारा प्राणवायू हा औद्योगिक कंपन्यांना पुरवला जात असल्याचा आरोप रुग्णमित्र राजेंद्र ढगे यांनी केला आहे. आम्ही वसई-विरार महापालिकेच्या रुग्णालयांना प्राणवायू पुरवतो. परंतु परवान्यावर इतर ठिकाणी प्राणवायू नेला जातो की नाही, याबाबत निश्चित सांगता येणार नाही, असे स्पीड कंपनीचे संचालक प्रसाद राऊत यांनी दिली. शहरात प्राणवायूची कमतरता असून दुसरीकडे कृत्रिम प्राणवायूची टंचाई होऊ  नये, यासाठी अन्न व औषध प्रशासन सज्ज झाले आहे. अन्न व औषध प्रशासनाचे अधिकारी अन्य ठिकाणी प्राणवायू जाऊ  नये याची खबरदारी घेत आहेत.

पालिकेकडे आणखी १५ टन ऑक्सिजन साठा

प्राणवायूची कमतरता रोखण्यासाठी वसई-विरार महापालिकेने अतिरिक्त प्राणवायू आणण्यासाठी प्रयत्ना सुरू केले आहेत. रायगड येथून प्राणवायू शहरात आणता यावा यासाठी पालिकेने टँकर घेतला असल्याची माहिती उपायुक्त किशोर गवस यांनी दिली. सोमवारी पालिकेकडे ५ टन प्राणवायू आला तर मंगळवारी देखील १० टन प्राणवायू आणल्याची माहिती पालिकेच्या मुख्य वैद्यकीय अधिकारी डॉ. सुरेखा वाळके यांनी दिली. यामुळे पालिकेकडे आता पुढील ३ दिवस पुरेल एवढा प्राणवायू शिल्लक असल्याची माहिती डॉ.वाळके यांनी दिली.

वसईत प्राणवायू रिफिलिंग करणाऱ्या दोन कंपन्या असून स्पीड या कंपनीत प्राणवायू तयार केला जात आहे. द्रव स्वरूपातील प्राणवायूचा कच्चा माल त्यांच्याकडे येतो. त्यावर प्रक्रिया करून प्राणवायू तयार केला जातो. मात्र हा कच्चा माल येणे बंद झाल्याने प्राणवायूची निर्मिती बंद पडल आहे.

  • प्रसाद राऊत, संचालक ,स्पीड कंपनी