वसई पश्चिमेतील वसई एसटी बस आगाराची इमारतीची दुर्दशा झाली आहे. इमारतीला अनेक ठिकाणी तडे गेले असून काही ठिकाणी स्लॅबचे काँक्रीट निखळून खाली कोसळले आहे. त्यामुळे ही इमारत धोकादायक झाली आहे.

वसई पश्चिमेतील भागात हे एसटी बस आगार आहे. या आगाराच्या ठिकाणी अधिकारीवर्ग, कर्मचारी यांच्या कामकाजासाठी व प्रवाशांना थांबण्यासाठी इमारत उभारण्यात आली आहे. या इमारतीत वाहतूक कार्यालय, रोख विभाग, बस वाहतूक कक्ष, एसटीची बँक व प्रवाशांना बसण्याची जागा अशी व्यवस्था आहे.

एसटीची ही इमारत अनेक वर्षे जुनी असल्याने सद्य:स्थितीत या आगारातील इमारतीची अत्यंत दयनीय अवस्था झाल्याचे चित्र दिसून येत आहे.

या अशा धोकादायक स्थितीत येथील कर्मचाऱ्यांना काम करावे लागत आहे. तर प्रवाशांना ही या ठिकाणी जीव मुठीत धरून या भागात उभे राहावे लागत आहे.  दररोज या ठिकाणी कर्मचारी कामकाजासाठी येतात तर विविध ठिकाणचे प्रवासी येत असतात जर इमारतीचा एखादा भाग निखळून पडला तर मोठा अपघात होऊन जीवितहानी होण्याची भीती नागरिकांमधून व्यक्त करण्यात येत आहे.

प्रवाशांची दुरुस्तीची मागणी

वसई एसटी आगाराची  इमारत धोकादायक स्थितीत आहे. दररोज या आगारातून मोठय़ा संख्येने प्रवासी प्रवास करतात तर काही प्रवासी तिकिटचे बुकिंग करण्यासाठी येत असतात. दररोज या आगारातून १७५ एसटीच्या फेऱ्या होतात. कधी कधी एसटी वेळेत येत नाही अशा वेळेस प्रवासी एसटीची वाट बघत या जर्जर झालेल्या  इमारतीच्या खालील बाजूस उभे असतात. यासाठी एसटी महामंडळाने कोणत्याही दुर्घटनेची वाट न पाहता या इमारतीची दुरुस्ती किंवा नूतनीकरण करण्यात यावे अशी मागणी करण्यात येत आहे.