यंदा पडलेल्या समाधानकारक पावसामुळे वसई-विरार शहराची पाण्याची चिंता मिटली आहे. शहराला पाणीपुरवठा करणारी सर्व प्रमुख धरणे भरली आहेत. पेल्हार पाठोपाठ उसगाव धरणही भरून वाहू लागले आहे तर सूर्या पाणीप्रकल्पाचे धामणी धरणदेखील ९७ टक्के भरले आहे.

जून महिना कोरडा गेल्यानंतर जुलै महिन्यात पावसाला सुरुवात झाली होती. मात्र त्यातही म्हणावा तसा जोर येत नसल्याने शहराला पाणीपुरवठा करणारी धरणे मागील वर्षांच्या तुलनेत भरली नव्हती. मात्र गेल्या काही दिवसांपासून धरण क्षेत्रात मुसळधार पाऊस पडत आहे. त्यामुळे शहरातील धरणे भरू लागली आहेत. पेल्हार धरणापाठोपाठ उसगाव धरणही भरून वाहू लागले आहे.

उसगाव धरण मागील वर्षी ६ ऑगस्ट रोजी भरून वाहत होते. मात्र या वर्षी हे धरण ६ ऑगस्ट रोजी केवळ ५५.६६ टक्के भरले होते. आता मात्रा हे धरण ओसंडून वाहू लागले आहे. धामणी धरणात २७६.३५ दशलक्ष घनमीटर पाणी साठा जमा झाला असून हे धरण ९५.१३ टक्के भरले आहे. मागील वर्षी हे धरण याच दिवशी ९२ टक्के भरले होते.

वसई-विरार शहराला सूर्या पाणी प्रकल्पाअंतर्गत धामणी धरणातून दररोज २०० दशलक्ष लिटर, पेल्हारमधून १० दशलक्ष लिटर आणि उसगाव धरणातून २० दशलक्ष लिटर पाणीपुरवठा गेला जातो. धरणे भरल्याने यंदादेखील वसईकरांची पाण्याची चिंता मिटली असून पाणीकपात केली जाणार नसल्याचे पालिकेतर्फे स्पष्ट करण्यात आले.