नवीन ठेकेदार नेमण्याचा वसई-विरार पालिकेचा निर्णय

सुहास बिऱ्हाडे/कल्पेश भोईर, लोकसत्ता

वसई : प्रवाशांची गैरसोय होत असतानाही परिवहन सेवा सुरू करण्यास नकार देणाऱ्या  ठेकेदाराला पालिकेने अखेर बाहेरचा रस्ता दाखवला. ठेका रद्द करून नवीन ठेकेदार नेमण्याचा निर्णय सोमवारी पालिकेने घेतला. कराराचे उल्लंघन करून बसगाडय़ा सुरू न केल्याने ठेकेदाराविरोधात गुन्हा दाखल केला जाणार आहे.

वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा २०१२ पासून ‘मेसर्स भगीरथी ट्रान्सपोर्ट’ या खासगी ठेकेदारामार्फत चालवली जाते. सध्या पालिकेच्या ताफ्यात १६० बसगाडय़ा आहेत. त्यापैकी १३० बसगाडय़ा या ‘भगीरथी’ या ठेकेदाराच्या आहेत. पालिकेची बससेवा ४३ मार्गावर सुरू आहे. मात्र, करोनाकाळात ही सेवा बंद आहे. ही परिवहन सेवा सुरू करण्याची  मागणी सातत्याने केली जात होती.

परिवहन सेवा बंद असल्याने सर्वसामान्य नागरिकांचे विशेषत: कामगारांचे मोठे हाल होत होते. त्यामुळे पालिकेने अनेकदा ठेकेदारासोबत बैठका घेऊन त्याला सेवा सुरू करण्याची विनंती केली होती. परंतु, तो अडून बसला होता.

पालिकेने शनिवार, ५ सप्टेंबरपासून शहरातील वसई स्थानक ते वसई तहसीलदार कार्यालय,  वसई ठाणे ते वसई फाटा, वसई स्थानक ते सातिवली फाटा, नालासोपारा स्थानक ते नालासोपारा फाटा, विरार पूर्व ते विरार फाटा अशा चार ठिकाणच्या मार्गावर बसगाडय़ांमध्ये ५० टक्के प्रवासी घेऊन बस  सेवा सुरू करण्यात यावी, असे आदेश दिले होते. परंतु, त्यालाही ठेकेदाराने स्पष्ट नकार दिला होता. मागील काही महिन्यांपासून सेवा बंद आहे. त्यातच पालिकेकडून विविध योजनांच्या सेवेची रक्कम येणे बाकी आहे. त्यामुळे सेवा सुरू करणे आर्थिकदृष्टय़ा परवडणारे नाही, असे सांगत ठेकेदाराने नकार दिला. परिवहन सेवा सुरू करायची झाल्यास पालिकेनेच आर्थिक साहाय्य करावे, अशी उलट मागणी ठेकेदाराने केली होती. त्यामुळे मोठा पेच निर्माण झाला होता.

परिवहन सेवा सुरू करण्याबाबत सोमवारी पालिकेची महत्त्वपूर्ण बैठक पार पडली. ठेकेदाराची मनमानी आणि आजवरच्या तक्रारी लक्षात घेऊन ठेका रद्द करण्यात आला. पालिका आयुक्त गंगाथरन डी. यांनी तात्काळ नवीन ठेकेदार नियुक्तीचे निर्देश दिले. त्यानुसार प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. मंगळवारी याबाबतच्या निविदा प्रसिद्ध केल्या जाणार असल्याची माहिती आयुक्तांनी दिली. जुन्या कराराप्रमाणे नवीन ठेकेदार नेमण्यात येणार आहे. त्याची प्रक्रिया सुरू करण्यात आली आहे. दोन महिन्यांत नवीन ठेकेदार सेवा सुरू शकतो, अशी माहिती पालिकेचे प्रभारी साहाय्यक आयुक्त (परिवहन) विश्वनाथ तळेकर यांनी दिली.

कर्मचाऱ्यांवर अन्याय

२०१२ पासून परिवहन सेवा सुरू करण्यात आली होती. मात्र ही सेवा सातत्याने वादग्रस्त ठरली आहे. निकृष्ट बसगाडय़ा, अप्रशिक्षित चालकांमुळे अपघातांची संख्या वाढली होती. धूर ओकणाऱ्या बसगाडय़ांमुळे प्रदूषणही वाढले होते. परिवहन सेवेत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांना किमान वेतनही मिळत नव्हते. कामगारांना वेळेवर पगार दिला जात नव्हता, भविष्य निर्वाह निधी, महागाई भत्ता मिळत नव्हता. त्यामुळे वर्षांच्या सुरुवातीसच कर्मचाऱ्यांनी दोनदा संप पुकारला होता.

ठेकेदारावर लवकरच कारवाई

शनिवारी चार मार्गावर सेवा सुरू करण्याचे आदेश धुडकावल्याने पालिकेने ठेकेदारावर कारवाईचा निर्णय घेतला आहे. याआधी ठेकेदाराविरोधात करण्यात आलेल्या तक्रारींचाही विचार केला जाणार असून त्याच्याविरोधात गुन्हा दाखल करण्यात येणार आहे.

परिवहन सेवा सुरू नसल्याने शहरातील प्रवाशांची खूप गैरसोय होत होती. ठेकेदाराला आदेश देऊनही तो सेवा सुरू करत नव्हता. त्यामुळे आम्ही ठेकेदार बदलण्याचा निर्णय घेतला आहे. या ठेकेदारावर कराराचे उल्लंघन केल्याप्रमाणे कारवाई करून गुन्हे दाखल करण्याचे निर्देश देण्यात येईल. नवीन ठेकेदार लवकरच नेमला जाईल.

– गंगाथरन डी., आयुक्त वसई विरार महापालिका

 शासनाच्या निर्णयानुसार ५० टक्के तोटा, आर्थिक मदत पालिकेने आम्हाला करावी. अन्यथा परिवहन सेवा सुरू करणे आर्थिकदृष्टय़ा शक्य होणार नाही.

– मनोहर सकपाळ, परिवहन ठेकेदार