News Flash

उद्घाटनाआधीच परिवहन सेवा सुरू

पालिका प्रशासन मंत्र्यांच्या प्रतीक्षेत

पालिका प्रशासन मंत्र्यांच्या प्रतीक्षेत

वसई : मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने उद्घाटनाअभावी रखडलेली वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा अखेर बहुजन विकास आघाडीने सुरू केली. शहरातील सहा मार्गावर सध्या सेवा सुरू झाली आहे. राजकीय पक्षाने परिवहन सेवा अचानक सुरू केल्याने पालिका प्रशासन मंत्र्यांना आणून औपचारिक उद्घाटन करण्याच्या तयारीत आहे.

मागील वर्षी करोनाचा संसर्ग सुरू झाल्यानंतर वसई-विरार महापालिकेची परिवहन सेवा बंद झाली होती. शासनाने अनलॉकची प्रक्रिया सुरू केली तरी ठेकेदाराने बसेस सुरू केल्या नव्हत्या. त्यामुळे पालिकेने वारंवार ठेकेदाराला परिवहन सेवा सुरू करण्याचे आदेश देऊनही ठेकेदार बसेस सुरू करत नव्हता. त्यामुळे पालिकेने ठेकेदाराची हकालपट्टी केली आणि नवीन ठेकेदार नेमला. मेसर्स एसएनएन या नव्या ठेकेदाराला शहरातील परिवहन सेवा सुरू करण्याचे कंत्राट देण्यात आले. ठेकेदाराला पालिकेने कार्यादेश दिला आणि नवीन बसेसदेखील पालिकेच्या ताफ्यात दाखल झाल्या. मात्र नव्याने सुरू होणऱ्या बससेवेचे उद्घाटन पालकमंत्री दादासाहेब भुसे आणि नगरविकासमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते करण्याचा पालिका प्रशासनाने ठरवले होते. मंत्र्यांची वेळ मिळत नसल्याने परिवहन सेवेचे उद्घाटन लांबणीवर पडत चालले होते. भाजप, बहुजन विकास आघाडी आदी पक्षांनी परिवहन सेवा सुरू करावी, अशी मागणी पालिका प्रशासनाकडे केली होती. परंतु पालिकेकडून काहीच प्रतिसाद मिळत नव्हता.

त्यामुळे बहुजन विकास आघाडीने अचानक नारळ फोडून परिवहन सेवा सुरू केली. विरार येथील पालिका मुख्यालयाबाहेर बहुजन विकास आघाडीचे प्रशांत राऊत, हार्दिक राऊत, यज्ञेश्वर पाटील, चिराऊ चौधरी यांच्यासह सर्व पदाधिकारी आणि नेत्यांच्या उपस्थितीत परिवहन सेवा सुरू करण्यात आली. दुसरीकडे भाजपनेही परिहवन सेवा आमच्यामुळे सुरू झाल्याचा दावा केला आहे. आम्ही सातत्याने  परिवहन सेवा सुरू झाली असे भाजपचे जिल्हाध्यक्ष राजन नाईक यांनी सांगितले.

राजकीय पक्षांनी बससेवा सुरू केल्याने पालिका प्रशासन हतबल झाले आहे आणि त्यांनी अधिकृत उद्घाटन करण्याचे पुन्हा प्रयत्न सुरू केले आहेत. सध्या परिवहन सेवा ६ मार्गावर सुरू करण्यात आली आहे. त्यापैकी वसई, नालसोपारा आणि विरार शहरांतील प्रत्येकी दोन मार्गाचा समावेश आहे. टप्प्याटप्प्याने शहरातील ४३ मार्गावर ही सेवा सुरू केली जाणार आहे. राजकीय श्रेयामुळे का होईना, परिवहन सेवा सुरू झाल्याने प्रवाशांनी आनंद व्यक्त केला आहे.

परिवहन सेवेअभावी सर्वसामान्य प्रवांशांची गैरसोय होत होती. नवीन ठेकेदार नेमून सर्व प्रक्रिया पूर्ण झाली होती. परंतु पालिका प्रशासनाला मंत्र्यांच्या हस्ते उद्घाटन करायचे असल्याने परिवहन सेवा सुरू होत नव्हती. त्यामुळे आम्ही जनतेच्या फायद्यासाठी कसलेही उद्घाटन न करता ही सेवा सुरू केली आहे.

– प्रीतेश पाटील, सभापती, परिवहन सेवा

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 5, 2021 3:27 am

Web Title: vasai virar municipal transportation service started before the inauguration zws 70
Next Stories
1 गाळपाचा जोर, अर्थचक्राला घोर!
2 शिवसेनेकडून गडकरींचे कौतुक!
3 विदर्भ माझ्या हृदयात, अन्याय होऊ देणार नाही..
Just Now!
X