लोकसत्ता, विशेष प्रतिनिधी

वसई-विरार शहरामध्ये पाच नवीन पोलिस ठाण्यांची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश नवनियुक्त पोलीस आयुक्त सदानंद दाते यांनी दिले आहेत. शुक्रवारी दाते यांनी वसईला भेट देऊन कामकाजाचा आढावा घेतला. वसई विरार आणि मीरा भाईंदर शहराचे मिळून नवीन पोलीस आयुक्तालय स्थापन करण्याची घोषणा राज्य शासनाने केली होती. या प्रस्तावित आयुक्तालयाचे पाहिले आयुक्त म्हणून सदानंद दाते यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पदभार स्वीकारल्यानंतर दाते यांनी शुक्रवारी वसईत भेट दिली. शहरातील वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांशी चर्चा करून त्यांनी कामकाजाचा आढावा घेतला.

वसई विरार शहरात सध्या वसई, विरार, नालासोपारा, माणिकपूर, वालीव, अर्नाळा सागरी आणि तुळींज असे सात पोलीस ठाणे आहेत. त्यांचे विभाजन करून ५ नव्या पोलीस ठाण्याची निर्मिती केली जाणार आहे. या पोलीस ठाण्यांची निर्मिती प्रक्रिया सुरू करण्याचे निर्देश दाते यांनी अतिरिक्त पोलीस अधीक्षक विजयकांत सागर यांना दिले. नवीन आयुक्तालयात पेल्हार, आचोळे, मांडवी, बोळींज, नायगांव ही सात नवीन पोलीस ठाणी प्रस्तावित आहेत.

मीरा-भाईंदर शहरामध्ये मीरारोड, काशिमिरा, नयानगर, नवघर, भाईंदर, उत्तन अशी सहा पोलीस ठाणी आहेत. त्यात काशीगांव आणि खारीगांव या दोन नवीन पोलीस ठाण्यांचा समावेश होणार आहे. नवीन पोलीस आयुक्तालयासाठी सध्या जागेचा शोध सुरू आहे.