माजी मुख्यमंत्री वसंतराव नाईक यांचे जन्मशताब्दी वर्ष व जिल्हा परिषदेच्या सुवर्णमहोत्सवी वर्षांनिमित्त यवतमाळ जिल्हा परिषदेच्यावतीने आयोजित वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनात प्राप्त झालेल्या निधीत कमालीची अनियमितता आणि अपहार झाल्याच्या काँॅग्रेसच्या आरोपामुळे आणि याप्रकरणी सर्वोच्च न्यायालयापर्यंत लढा देण्याचा इशारा काँग्रेसने दिल्यामुळे सत्तारूढ राष्ट्रवादी काँग्रेसचे जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांचे अध्यक्षपद धोक्यात आले असून राष्ट्रवादीची प्रतिष्ठा राखण्यासाठी पक्षश्रेष्ठी काय निर्णय घेतात, याकडे अनेक कार्यकर्त्यांचे लक्ष लागले आहे.
वसंत अॅग्रोटेकसाठी राज्य सरकारने दीड कोटी रुपये मंजूर केले, तर स्टॉलधारक आणि कृषी साहित्य विक्रेत्यांकडून ५१ लाख ५० हजार ७८० रुपये जिल्हा परिषदेने जमा केले. उल्लेखनीय म्हणजे, व्यवस्थापनासाठी ४३ लाख रुपये कंत्राटदाराला देण्याचा करार केलेला असताना प्रत्यक्षात मात्र ९५ लाख ३७ हजार रुपये खर्च झाल्याचा दावा करण्यात आला.
प्रचार-प्रसिद्धिसाठी ३९ लाख रुपये, निमंत्रण पत्रिका छपाई व वितरण यावर १ लाख रुपये, पाणी व्यवस्थापनावर ३ लाख रुपये, कार्यालयीन व्यवस्थापनावर ८८ हजार रुपये, सांस्कृतिक कार्यक्रमांवर ३.५० लाख रुपये, मदान आणि भोजनावर ११ लाख रुपये, शेतकऱ्यांच्या सत्कारावर ५ लाख रुपये, फाईल्स, लेटरहेड, फोल्डर इत्यादीवर ७ लाख रुपये, मान्यवर पाहुणे व शेतकऱ्यांच्या जेवणावर ८ लाख रुपये, चर्चासत्र, स्टॉल्स, ध्वनिक्षेपण, व्हीआयपी बठक व्यवस्था आदींवर ७१ लाख रुपये खर्च झाल्याचा दावा जिल्हा परिषद अध्यक्षांनी केल्यावर विरोधी पक्षनेते काँॅग्रेसचे जिल्हा परिषद सदस्य देवानंद पवार यांच्यासह सर्व काँॅग्रेस सदस्यांनी या खर्चाला विरोध करून राष्ट्रवादीला चांगलेच अडचणीत आणले. खर्चाचे व्हाउचर्स द्या, अशी काँग्रेसने केलेली मागणी मान्य करण्यात आली, पण ती जिल्हा परिषद अध्यक्षांनी नाकारल्याचे देवानंद पवार यांनी म्हटले आहे.
जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत काँॅग्रेसने राष्ट्रवादीवर केलेल्या या आरोपांना प्रवीण देशमुख यांनी वार्ताहर परिषद घेऊन फेटाळून लावले असले तरी हे प्रकरण अध्यक्षांच्या चांगलेच अंगलट येण्याची चर्चा आहे.
प्रवीण देशमुख यांनी आपली बाजू सावरत मंगळवारी वार्ताहर परिषदेत स्पष्ट केले की, कृषी प्रदर्शनात पशाचा अपहार किंवा अनियमितता झालेली नाही.
विविध मार्गाने आम्ही ५१.५० लाख रुपये जमा करून खर्चाचा हिशेब ठेवला आहे. शासनाने दिलेल्या दीड कोटी रुपयांच्या खर्चाचाही हिशेब तयार आहे. व्यवस्थापन खर्चाचा करार ४३ लाख रुपयांचा होता, पण काही अपरिहार्य कारणाने प्रदर्शन पुढे ढकलण्यात आल्याने नियोजित खर्चापेक्षा प्रत्यक्षात खर्च जास्त अर्थात, ९५ लाख ३७ हजार रुपये झाला, ही बाब जिल्हा परिषद अध्यक्षांनी मात्र कबूल केली.
वसंत अॅग्रोटेक कृषी प्रदर्शनावर मंजूर खर्चापेक्षा अतिरिक्त खर्च करून शेतकऱ्यांसाठी आलेल्या निधीच्या पैशात अपहार करण्यात आला असल्याचा गंभीर आरोप काँॅग्रेसने केला असून कृषी प्रदर्शनाच्या झालेल्या खर्चाचे व्हाउचर्स जिल्हा परिषद अध्यक्ष प्रवीण देशमुख यांनी सभागृहाला द्यावे, अशी मागणी देवानंद पवार यांनी सभागृहात केल्यामुळे अध्यक्षांची चांगलीच अडचण झाली आहे.
या सर्व प्रकरणाची पक्षश्रेष्ठींनी गंभीर दखल घेतल्याचे वृत्त आहे. जिल्हा परिषदेच्या विशेष सभेत  प्रदर्शनाच्या खर्चाला मान्यता देण्यात आल्यामुळे अध्यक्षांना तूर्तास तरी हायसे वाटत आहे.