प्रतीक पाटलांच्या राजीनाम्यापाठी विशाल पाटील यांचाही बंडाचा पवित्रा

सांगली : लोकसभेची सांगलीची जागा स्वाभिमानी शेतकरी संघटनेला सोडण्याच्या काँग्रेसच्या भूमिकेमुळे वसंतदादा गट बंडखोरीच्या तयारीत आहे. दादा गटाच्या मेळाव्यात माजी मुख्यमंत्री वसंतदादा पाटील यांचे नातू प्रतीक पाटील यांनी काँग्रेसला सोडचिठ्ठी देत असल्याचे जाहीर केल्यानंतर विशाल पाटील यांनी याच मेळाव्यात ही भूमिका स्पष्ट केली. तर  वसंतदादा गटाच्या या भूमिकेमुळे खा. राजू शेट्टी यांनी सांगलीची वादग्रस्त जागा लढविण्यास संघटनेची तयारी नसल्याचे सोमवारी पत्रकार बठकीत सांगितले.

वसंतदादा यांच्या समाधीस्थळी रविवारी सायंकाळी दादा प्रेमी गटाचा मेळावा घेण्यात आला. या मेळाव्यास कोल्हापुरातील काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष प्रकाश आवाडे, प्रदेश सरचिटणीस सत्यजित देशमुख, प्रदेश उपाध्यक्षा शैलजा पाटील, राष्ट्रीय कार्यकारिणी सदस्या जयश्री पाटील आदींसह महापालिकेतील पक्षाचे आजी माजी सदस्य, जिल्हा परिषद सदस्य उपस्थित होते.

या बठकीमध्ये माजी केंद्रीय राज्यमंत्री प्रतीक पाटील यांनी काँग्रेसची उमेदवारी मित्रपक्षाला सोडण्याबाबत आम्हाला विश्वासात घेतले नसल्याचे सांगत आपण काँग्रेसमधून बाहेर पडण्याचा निर्णय घेत असल्याचे जाहीर केले. यापुढील काळामध्ये आपण दादांच्या विचाराने समाजकारण करणार असल्याचेही ते म्हणाले.

याच मेळाव्यात दादांचे नातू विशाल पाटील यांनी  दादा घराणे संपविण्याचे जाणीवपूर्वक प्रयत्न होत असल्याचा आरोप करीत आपण लोकांच्या कार्यकर्त्यांच्या आग्रहाखातर लोकसभा निवडणुकीच्या मदानात उतरण्यास तयार असल्याचे जाहीर केले. तसेच दादांचे विचार कोणी संपविण्याचा प्रयत्न केला तर आमच्या अंगात दादांचे रक्त असल्याने हे कदापि होऊ देणार नाही असा इशारा दिला.

दरम्यान, दादा गटाच्या बठकीतील या भूमिकेचे पडसाद  स्वाभिमानी संघटनेतही उमटले असून अशी वादग्रस्त जागा स्वीकारण्यास आपला नकार असल्याचे जाहीर करून खा. शेट्टी यांनी काँग्रेस अंतर्गत असलेले वाद त्या पक्षाने उद्यापर्यत संपवून द्यावेत, अन्यथा आम्ही एकाकी लढतीस तयार असल्याचे ते म्हणाले. तर सांगलीमध्ये वसंतदादा गटाचा विरोध पत्करून जागा लढविण्याची स्वाभिमानीची भूमिका असणार नाही असेही त्यांनी सांगितले.

महाआघाडीत ठरल्याप्रमाणे अद्याप शिर्डी आणि बुलढाणा या जागेबाबत स्वाभिमानीचा विचार होऊ शकतो, असेही आपण काँग्रेसला कळविले असून याबाबत माजी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांच्याशी आपली काल चर्चा झाली असल्याचेही त्यांनी सांगितले. माजी मंत्री प्रतीक पाटील यांना स्वाभिमानीच्या चिन्हावर लढण्याबाबत विचारणा केली होती, मात्र त्यांनी  नकार दिला असल्याचे खा. शेट्टी यांनी सांगितले.