जिल्हा परिषद निवडणुकीमध्ये शून्यातून किमया करणाऱ्या भाजपाच्या यशाचे गणित काँग्रेस आणि राष्ट्रवादीच्या नेत्यांच्या कूपमंडूक मनोवृत्तीत दडलेले आहे. सामान्य माणसाच्या आकांक्षाची पूर्ती करण्यासाठी १५ वष्रे सत्तेत असताना सगेसोयरे यांचेच नेतृत्व आणि एकमेकाला शह देण्यासाठी कधी पडद्याआड, तर कधी उघडपणे केलेल्या कुरघोडय़ांचे हे फलित मानले पाहिजे. जिल्ह्य़ात भाजपाचे २५ सदस्य निवडून आले असले तरी खासदार संजयकाका पाटील यांच्या अल्पयशाची आणि शिराळ्यात मंत्रिपदाचे स्वप्न पाहणाऱ्या आमदार शिवाजीराव नाईक यांच्या अपयशाची काळी किनारही लाभली आहे.

स्व. वसंतदादा पाटील यांच्या काळापासून जिल्हा परिषदेवर आणि पंचायत समितीवर काँग्रेसचा झेंडा डौलाने फडकत होता. राष्ट्रवादीची स्थापना झाल्यानंतर झेंडय़ात थोडा-फार फरक झाला असला तरी चेहरे तेच होते. आणि भाजपाला सर्वाधिक म्हणजे २५ जागा मिळाल्या असल्या तरी नेतृत्व मात्र त्याच पठडीतील आहे. मात्र या चेहऱ्यांमागील विचार, कृती आणि आराखडे वेगळे आहेत. एवढाच काय तो फरक. राज्याच्या स्थापनेपासून सांगली लोकसभा मतदारसंघ हा काँग्रेसच्या कायम ताब्यात होता, पण २०१४ मध्ये भाजपचे संजयकाका पाटील यांनी हा गड भेदला. आता जिल्हा परिषदेतही काँग्रेस व राष्ट्रवादीची वाताहत झाली.

काँग्रेसचे नेते डॉ. पतंगराव कदम आणि राष्ट्रवादीचे नेते आमदार जयंत पाटील यांच्यातील राजकीय संघर्षांचा फटका दोन्ही काँगेसला बसला. एकमेकांचा परस्पर काटा काढण्याच्या प्रयत्नात शत्रूचा शत्रू तो आपला मित्र याच न्यायाने वागल्यामुळे आज दोन्ही काँग्रेसची अवस्था बिकट झाली आहे असे म्हणावे लागेल.

विधान परिषद निवडणुकीमध्ये डॉ. कदम यांनी आपल्या बंधूंना काँग्रेसची उमेदवारी मिळवून दिली. मात्र याच वेळी कागदावर बलवान असलेल्या राष्ट्रवादीलाही शिकस्त देत जिल्हाध्यक्ष मोहनराव कदम यांनी शेखर गोरे यांना पराभूत करीत विधान परिषदेत प्रवेश केला. यामागे धनशक्तीचा वापर झाला की, विचारांचा विजय झाला हे कळायला फार मोठा तत्त्वज्ञ असण्याचीही गरज नाही. मात्र यानंतर झालेल्या नगरपालिका निवडणुकीतही काँग्रेस, राष्ट्रवादीला जमिनीवर यावे असे वाटले नाही. इस्लामपूर, तासगाव या दोन नगरपालिका गेल्या तरी बोध कोणी घ्यायचा असे म्हणत स्वप्नरंजनात गुंतल्याने आज मतदारांनीच हा बोध देण्याचा निर्णय घेतला तर मतदारांचे काय चुकले? कडेगाव, पलूस हे काँग्रेसचे बालेकिल्ले. या ठिकाणी कदमांच्या घरातील केवळ एक उमेदवार विजयी होतो व बाकीचे सगळे उमेदवार पराभूत होतात. यामागे इतक्या दिवसाचे राजकारण करणाऱ्याला लक्षात येत नाही असे म्हणणे भाबडेपणा ठरावा. मिरज तालुक्यात भाजपाने मुसंडी मारली. यामागील विधानसभेवेळी भाजपाचेच सुरेश खाडे हे विजयी होत आले.

मतभेदांचा काँग्रेसला फटका

पलूस, कडेगाव, खानापूर, आटपाडी, जत आणि मिरज या तालुक्यात काँग्रेसचा झालेला पराभव हा पक्षांतर्गत मतभेदाचा पराभव आहे. मिरज तालुक्यात काँग्रेस अंतर्गत विशाल-प्रतीकचा एक गट, मदनभाऊंचा एक आणि कदमांचा एक असे विभाजन दिसले. पश्चिमेला वेगळीच शक्ती कार्यरत होती. प्रत्येक नेत्याने आपल्या सोयीनुसार विधानसभेची मोच्रेबांधणी करीत आपल्या ताकदीचा वापर करीत राजकीय प्याद्यांचा वापर केल्याने अखेर सर्वाचीच लायकी मतदारांनी जोखली.

डॉ. कदम यांचा मतदारसंघ जसा अडचणीत आला तसा आज आमदार जयंत पाटील यांचा वाळवाही असुरक्षित झाला आहे. याला कारण बागणीत झालेला पक्षाच्या उमेदवाराचा पराभव असे म्हणावे लागेल. या ठिकाणी राष्ट्रवादीचे जिल्हाध्यक्ष विलासराव िशदे यांचे चिरंजीव वैभव िशदे हे बंडखोर संभाजी कचरे यांच्याकडून पराभूत झाले. यामागे जयंत पाटील यांच्या विविध सहकारी संस्थांतील पदाधिकाऱ्यांचा हातभार आहे.

भाजपाला यश मिळाले असले तरी यातही काही प्रमाणात डावे-उजवे झाले आहे. खा. संजयकाका पाटील यांचा उधळलेला वारू रोखण्यात आर. आर. आबा गटाला शक्य झाले. आबांच्या पत्नी सुमनताई पाटील यांनी तासगावात स्वबळावर निर्णय घेत असताना कवठय़ात मात्र घोरपडे गटाशी जुळवून घेत भाजपाच्या घोडय़ाला लगाम घातला. यामुळे राष्ट्रवादीला १४ जागांपर्यंत मजल मारता आली. मात्र खासदारांनाही याचे आत्मपरीक्षण करावे लागणार आहे.

राज्यमंत्री सदाभाऊ खोत यांनी आपल्या मुलाला यानिमित्ताने सार्वजनिक राजकारणात आणण्याचा प्रयत्न केला असला तरी त्यात मर्यादित यश मिळाले. खा. राजू शेट्टी आणि राज्यमंत्री खोत यांच्यातील सत्तासंघर्ष नजीकच्या काळात नव्या वळणावर पोहचत आहे. याचे मूळ सत्तासुंदरीचा मोह हेच आहे. शिराळ्यात आमदार शिवाजीराव नाईक यांचे मंत्रिपदाचे स्वप्न भंगले. जतमध्ये विलासराव जगताप यांनी आपला गड शाबूत राखला असून आटपाडीमध्ये राजेंद्रअण्णा देशमुख यांचा भाजपा प्रवेश राष्ट्रवादीला महागात पडला. खानापुरात ग्रामीण भाग आजही आ. अनिल बाबर यांच्या पाठीशी असल्याचे दिसून आले असले तरी यामागे काँग्रेस अंतर्गत असलेल्या गटबाजीचे पाठबळही आहे.

जिल्ह्य़ातील जनतेने विकासाच्या मुद्दय़ावर भाजपाला विजयी केले असून जनतेच्या आशा आकांक्षांना पूर्णत्व देण्याचा प्रामाणिक प्रयत्न यानिमित्ताने केला जाईल. केंद्र आणि राज्यातील सरकारकडून जास्तीत जास्त निधी मिळवून विकासाचा मार्ग खुला करण्यास प्राधान्य देण्यात येईल. समविचारी पक्षांचा सन्मान करीत सत्ता राबवीत असताना सामान्य माणूस हाच केंद्र मानून कार्यरत राहू. यापुढील काळात महापालिका हेच आमचे राजकीय उदिष्ट असेल.

पृथ्वीराज देशमुख, भाजपचे जिल्हाध्यक्ष

केंद्र व राज्यातील शासनाच्या भूलथापांना सामान्य लोक बळी पडले. सत्तेचा पुरेपूर वापर भाजपाने या निवडणुकीत केला. शासनाची चुकीची धोरणे लोकापर्यंत पोहचविण्यासाठी कमी वेळ आम्हाला मिळाला. प्रचारासाठी कमी वेळ मिळाला हेही काँग्रेसच्या पराभवाचे कारण म्हणावे लागेल, मात्र यापुढील काळातही आम्ही शेतकऱ्यांच्या प्रश्नासाठी आग्रही भूमिका काँग्रेसची राहील.

पृथ्वीराज पाटील, काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष