शहरातील मृत्यूचा सापळा बनलेल्या वसमत रस्त्यावर दुभाजक टाकण्याचे काम सुरू झाले आहे. खासदार संजय जाधव यांच्या हस्ते या कामाचे उद्घाटन झाले. शहरातून २२२ हा राष्ट्रीय महामार्ग जातो. आतापर्यंत शेकडो बळी या रस्त्याने घेतले आहेत.
शहरातून जाणारा राष्ट्रीय महामार्ग गेल्या अनेक वर्षांपासून धोकादायक बनला होता. शिवाजी पुतळा ते दत्तधाम मंदिर दरम्यान या रस्त्यावर अनेक शाळा-महाविद्यालये आहेत. निम्म्या शहरातील वसाहतींना जोडणारा एकमेव रस्ता असल्याने रस्त्यावर सतत वर्दळ असते. औरंगाबाद, गंगाखेड तसेच बीडकडून वसमत, नांदेड व िहगोलीला जाणारी अनेक वाहने याच रस्त्याने धावतात. त्यामुळे या रस्त्यावर नेहमीच अपघात घडतात. आजपर्यंत शेकडो लोकांचे या अपघातांनी बळी घेतले. रस्त्यावर दुभाजकाची आत्यंतिक आवश्यकता होती. दुभाजकासोबत रस्ता रुंदीकरण होणे गरजेचे ठरले होते. खासदार जाधव यांनी रस्ता दुभाजकासाठी प्रयत्न सुरू केले होते. त्यांनी यापूर्वी या साठी आंदोलनही केले. सध्या कामाला सुरुवात झाली असून, दुभाजक टाकण्याचे काम लवकरच पूर्ण होणार आहे.
आमदार डॉ. राहुल पाटील, शिवसेना जिल्हाप्रमुख गंगाप्रसाद आणेराव, सहायक पोलीस अधीक्षक प्रणय अशोक, राष्ट्रीय महामार्ग उपअभियंता कन्नेवार, व्यापारी महासंघ अध्यक्ष नंदकिशोर अग्रवाल, मनपा गटनेते अतुल सरोदे आदी उपस्थित होते.