मुख्यमंत्री फडणवीस यांची पंढरपूरमध्ये घोषणा
बेदाण्यावरील व्हॅट रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी बुधवारी केली. राज्यातील अवर्षण प्रवण भागासाठी केंद्राकडे १० हजार कोटी रुपयांचा प्रस्ताव सादर केल्याची माहिती त्यांनी येथे दिली. राज्यातील बेदाणा उत्पादक शेतकऱ्यांची बऱ्याच दिवसांपासून प्रलंबित असलेली मागणी पूर्ण करतो,असे सांगत बेदाण्यावरील व्हॅट रद्द केल्याची घोषणा मुख्यमंत्र्यांनी केली.
मुख्यमत्री देवेंद्र फडणवीस, अर्थमंत्री सुधीर मुनगंटीवार, सहकारमंत्री चंद्रकांत पाटील, पाणीपुरवठामंत्री बबनराव लोणीकर, जलसंपदा व जलसंधारण राज्यमंत्री विजय शिवतारे, पालकमंत्री विजयकुमार देशमुख, खा.शरद बनसोडे बुधवारी पंढरपूर दौऱ्यावर होते. येथील कृषी उत्पन्न बाजार समितीमध्ये शेतकरी मेळावा आयोजित केला होता. त्या वेळी मुख्यमंत्री बोलत होते. या मेळाव्यात सहकारमंत्री चंद्रकांत पाटील म्हणाले की, शेतकऱ्यांना पाणी, वीज मिळाली तर चांगला भाव मिळेल आणि शेतकरी समाधानी होईल. शेतकरी समाधानी राहील याकडे सरकारचे लक्ष आहे. पणनच्या माध्यमातून सरकारने अनेक योजना आणल्या आहेत.
‘चांगला पाऊस पडू दे आशी प्रार्थना विठूरायाकडे करीत आहे. आमचे सरकार येण्याआधी जवळपास १७ लाख शेतकरी विमा काढायचे. आता ही संख्या १ कोटी १३ लाखांवर गेली आहे. या विम्यापोटी ४६०० कोटी रुपये दिले आहेत. आधीच्या सरकारने जे १५ वर्षांंत केले नाही ते आम्ही दीड वर्षांत केले. राज्यातील सिंचानासाठी विशेष लक्ष दिले जात आहे. अवर्षण प्रवण भागासाठी केंद्राकडे १० हजार कोटी रुपयाचा प्रस्ताव पाठविला आहे,’ असे मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
शेतीक्षेत्रात गुंतवणूक वाढावी यासाठी सरकारचे प्रयत्न सुरू आहेत. सध्या २ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आहे. येत्या दोन वर्षांत ४ लाख हेक्टर क्षेत्र ठिबक सिंचनाखाली आणणार आहे. या कार्यक्रमाचे प्रास्ताविक आ.प्रशांत परिचारक यांनी केले. या मेळाव्यासाठी पंचक्रोशीतील शेतकरी मोठय़ा संख्येने उपस्थित होते.

यात्रा अनुदान आता ५ कोटी
पंढरपूर नगरपालिकेला यात्रा अनुदान २ कोटी रुपये दिले जाते. यामध्ये वाढ करून आता यात्रा अनुदान ५ कोटी रुपये दिले जाईल, अशी घोषणा मुख्यमंत्री फडणवीस यांनी केली. देश-विदेशातून भाविक मोठय़ा श्रद्धेने पंढरीत येतात. इथे येणाऱ्या भाविकांना सोयीसुविधा उपलब्ध करून देण्यासाठी विकास आरखडा तयार केला जाणार आहे. हा आरखडा कालबद्धतेने राबवून सर्व विकासकामे वेळेत पूर्ण केली जातील, असे मुख्यमंत्र्यांनी या वेळी सांगितले.