|| प्रबोध देशपांडे

सामाजिक जोडजुळणी प्रयोगद्वारे अ‍ॅड्. आंबेडकरांना शह?

अकोला : वंचित बहुजन आघाडीतील दोन माजी आमदारांसह अनेक पदाधिकाऱ्यांनी राजीनामास्त्र उगारून पक्षाला सोडचिठ्ठी दिली. त्यांच्या भविष्यातील राजकीय खेळीकडे लक्ष लागले असताना ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याची माहिती पुढे आली. बाहेर पडलेले माजी आमदार आणि पदाधिकारी हातात घडय़ाळ बांधण्याची चिन्हे आहेत. ‘वंचित’ला जोरदार धक्का देण्याची राष्ट्रवादीची ही सुनियोजित खेळी असल्याची चर्चा राजकीय वर्तुळात होत आहे. विविध समाजांच्या नेत्यांची मोट बांधून राष्ट्रवादीही ‘वंचित’प्रमाणे सामाजिक जोडजुळणीचा प्रयोग करण्याची शक्यता आहे.

गेल्या वर्षभरात झालेल्या निवडणुकांमध्ये राज्यात ‘वंचित’चा घटक प्रभावी ठरला. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्या नेतृत्वाखालील वंचित बहुजन आघाडी विजयाचे गणित जुळवू शकली नसली तरी वंचितच्या उपद्रव्य मूल्यातून काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडी जबर घायाळ झाली. अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांनी दलित, मुस्लीम, धनगर, ओबीसी, आदिवासी आदींची एकत्रित मोट बांधून वंचित आघाडीचा नवा प्रयोग केला. लोकसभेला सुमारे ४१ लाख आणि विधानसभेला २४ लाख मते मिळवली. वंचितच्या मतांमुळे काँग्रेस-राष्ट्रवादीला फटका बसला तर युतीला लाभ झाल्याचे आकडेवारीवरून स्पष्ट होते. दोन्ही निवडणुकांमध्ये एकही जागा जिंकू न शकल्याने ‘वंचित’मध्ये अंतर्गत नाराजी आणि गटातटाचे राजकारण वाढले. अशा परिस्थितीतही अ‍ॅड. आंबेडकरांनी अकोला जिल्हा परिषदेचा गड एकहाती कायम राखला. पक्षाच्या माजी आमदार आणि पदाधिकाऱ्यांनी विश्वासात घेतले नसल्याचे कारण पुढे करून जाहीर नाराजी व्यक्त केली. काहींनी पक्षविरोधी काम केले. त्यामुळे त्यांच्यावर कारवाईची टांगती तलवार होती. अखेर वंचित बहुजन आघाडीतील अंतर्गत खदखद शनिवारी उफाळून आली. पक्षाचे अकोल्यातील माजी आमदार हरिदास भदे, बळीराम सिरस्कार आणि राज्यातील ४६ पदाधिकाऱ्यांनी पदांचा सामूहिक राजीनामा दिला. बाहेर पडलेल्या नेत्यांच्या भविष्यातील वाटचालीवरील चर्चा रंगत असतानाच ते राष्ट्रवादीच्या संपर्कात असल्याचे स्पष्ट झाले.

महाराष्ट्रातील राजकारणात शरद पवार आणि अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यात कधी फारसे सख्य राहिले नाही. दोघांनीही एकमेकांवर वारंवार आरोप-प्रत्यारोप केले आहेत. त्यातच निवडणुकात वंचितमुळे राष्ट्रवादीसह काँग्रेसचे नुकसान झाले. धर्मनिरपेक्ष मतांचे विभाजन टाळण्यासाठी अ‍ॅड. आंबेडकरांच्या भूमिकेवर नेहमीच प्रश्नचिन्ह उपस्थित केले जाते. राष्ट्रवादीमुळेच आपण काँग्रेससोबत जात नसल्याचे अ‍ॅड. आंबेडकरांनी जाहीर केले आहे. निवडणुकानंतर ‘वंचित’मधील नाराजीचा लाभ उठवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळल्याची खमंग चर्चा आहे. ‘वंचित’मधील काही नाराज बाहेर पडण्याच्या पूर्वीपासूनच राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. काहींची अगोदरच शरद पवार यांच्यासोबत प्रत्यक्ष चर्चाही झाल्याची माहिती आहे. त्यानंतरच शनिवारी सामूहिक राजीनामे देऊन वंचित आघाडीला धक्का देण्यात आला. त्यामुळे हे राजकीय नाटय़ पूर्वनियोजितच  असल्याची चर्चा आहे. आता दोन्ही माजी आमदारांसह पदाधिकाऱ्यांच्या राष्ट्रवादीमध्ये प्रवेशाच्या हालचाली सुरू आहेत. शरद पवारांसोबत माजी आमदार आणि धनगर समाजाचे नेते हरिदास भदे यांची एक बैठक झाली. त्या वेळी राष्ट्रवादीचे नेते रामेश्वर पवळ उपस्थित होते. ते मध्यस्थाची भूमिका पार पाडत असून यापूर्वीही त्यांनी अनेकांना पक्षात प्रस्थापित केले. वंचित आघाडीत विश्वासात घेतले जात नसल्याने विधानसभा निवडणुकीपासून भदे नाराज होते. अखेर त्यांनी वंचितची साथ सोडून राष्ट्रवादीशी जवळीक साधली. भदेंपाठोपाठ माळी समाजाचे नेते आणि माजी आमदार बळीराम सिरस्कारही राष्ट्रवादीच्या संपर्कात आहेत. मध्यंतरी त्यांनी काँग्रेस नेत्यांशीही चर्चा केल्याची माहिती आहे. सिरस्कारांनी वंचितच्या तिकिटावर बुलढाणा लोकसभा निवडणूक लढली. त्या ठिकाणी त्यांचा पराभव झाला. बाळापूरचे विद्यमान आमदार असताना सिरस्कारांची उमेदवारी कापून डॉ. धर्यवर्धन पुंडकरांना वंचित आघाडीने रिंगणात उतरवले.

अ‍ॅड. प्रकाश आंबेडकरांचा सामाजिक जोडजुळणीचा प्रयोग अकोल्यात कमालीचा यशस्वी ठरला. छोटय़ा-मोठय़ा जातींना एकत्रित आणत अ‍ॅड. आंबेडकरांनी मोठी ताकद निर्माण केली. विविध जातींना त्यांनी सत्तेत प्राधान्याने वाटा दिला. आता हाच प्रयोग राष्ट्रवादी काँग्रेस राज्यात करण्याचा अंदाज आहे. त्यामुळेच विविध जातींच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार असल्याची माहिती आहे. वंचितमधील हरिदास भदे आणि बळीराम सिरस्कार हे दोन मोहरे राष्ट्रवादीच्या गळाला लागले असून, त्यांचा पक्षप्रवेश पुढील महिन्यात होऊ शकतो. मुंबई येथील ‘वंचित’चे जिल्हाध्यक्ष राहुल डोंगरे यांच्यासह सुमारे ५०० जणांनी राष्ट्रवादीत प्रवेश केला आहे.

महिलादिनी पुढील रणनीती ठरणार

जागतिक महिलादिनी ८ मार्चला शरद पवार यांच्यासोबत माजी आमदार हरिदास भदे व १०० ते १५० जणांची बैठक मुंबईत आयोजित करण्यात आली आहे. या बैठकीत उपमुख्यमंत्री अजित पवार, प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, गृहमंत्री अनिल देशमुख आदींसह राष्ट्रवादीचे प्रमुख नेते उपस्थित राहणार आहेत. या बैठकीत पक्षप्रवेश व पुढील रणनीती ठरणार असल्याची माहिती आहे.

पक्ष सोडणाऱ्यांना आणखी काय हवे?

दोन माजी आमदारांसह ४६ पदाधिकाऱ्यांनी वंचितची साथ सोडली. पक्षात कार्यरत असताना हरिदास भदे यांच्या वाटय़ाला पंचायत समिती सभापती, पक्षाचे जिल्हाध्यक्ष, दहा वर्षे आमदारकी व बळीराम सिरस्कार यांनाही पक्षाचे जिल्हाध्यक्ष, जिल्हा परिषद अध्यक्ष व दहा वर्षे आमदारकी अशी सन्मानाची पदे मिळाली. सर्व लाभाची पदे उपभोगूनही पक्ष सोडणाऱ्यांना आणखी काय हवे, असा खडा सवाल वंचित आघाडीकडून विचारला जात आहे.

अ‍ॅड्. प्रकाश आंबेडकर म्हणतात, ‘नो कॉमेंट्स’

या संदर्भात वंचित बहुजन आघाडीचे अध्यक्ष अ‍ॅड. प्रकाश आंबेडकर यांच्यासोबत संपर्क साधला असता, ‘नो कॉमेंट्स’ असे ते म्हणाले. पक्षाला सोडून जाणाऱ्यांबद्दल आम्ही काहीही बोलत नाही, असे त्यांनी सांगितले.

  रणनीती अशी..

  • वंचितमधील नाराजीचा लाभ उठवण्याची खेळी राष्ट्रवादीने खेळल्याची खमंग चर्चा.
  •  विविध समाजांच्या नेत्यांना एकत्र आणून राष्ट्रवादीही ‘वंचित’प्रमाणे सामाजिक जोडजुळणीचा प्रयोग करण्याची शक्यता.
  • विविध जातींच्या नेत्यांना पक्षात प्रवेश देऊन त्यांच्यावर महत्त्वाची जबाबदारी दिली जाणार.
  • वंचितमधील काही नाराज  पक्ष राष्ट्रवादीच्या संपर्कात होते. काहींची  पवार यांच्याशी चर्चा?