उमरेड परिसरातील सामूहिक अत्याचार प्रकरण; हंसराज अहिर आणि जयंत पाटील यांनी घेतली भेट

उमरेड येथील वेस्टर्न कोलफिल्ड लिमिटेड (वेकोलि) कंपनीच्या खाण परिसरात सामूहिक बलात्कार करून तरुणीला ठार मारण्याचा प्रयत्न झाला. ही तरुणी सध्या जीवन- मृत्यूशी संघर्ष करीत आहे. तिच्या या अवस्थेला वेकोलि प्रशासनाचा बेजबाबदार पणा कारणीभूत असून निर्जनस्थळी एका तरुणीची नियुक्ती करण्याची गरजच काय, ती प्रकल्पग्रस्त असल्यानेच तिला असे अडगळीत टाकण्यात आले होते काय, असा संतप्त प्रश्न आता उपस्थित केला जात आहे.

तरुणीची प्रकृती अत्यवस्थ असून ती सध्या व्हेंटिलेटरवर आहे. पिडितेच्या चेहऱ्यावर सुमारे ३५ फॅक्चर असून तिच्यावर बुधवारी तब्बल सहा तास शस्त्रक्रिया करण्यात आली. जिवन- मृत्यूशी संघर्ष करणाऱ्या तरुणीची गुरूवारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर आणि राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील यांनी भेट घेत त्यांच्या कुटुंबाची विचारपूस केली.

पिडितेचा एक डोळा पूर्णपणे निकामी झाला आहे. दुसऱ्या डोळ्यावर खूप जास्त सूज आहे. त्यामुळे डॉक्टरांना तो सुरक्षित राहण्याची पूर्णपणे खात्री नाही. बुधवारी ऑरेंज सिटी रुग्णालयातील तज्ज्ञ डॉक्टरांकडून फेशियल बोन रिकन्स्ट्रक्शन शस्त्रक्रिया करण्यात आली. याप्रसंगी चेहऱ्यावरील सुमारे ३५ लहान- मोठे हाड एक मेकांशी जोडण्याचा प्रयत्न झाला. सुमारे सहा तास झालेल्या शस्त्रक्रियेनंतर पिडीतावर तज्ज्ञ डॉक्टर बारिक लक्ष ठेवून आहेत.

दरम्यान राष्ट्रवादी काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष जयंत पाटील, माजी मंत्री अनिल देशमुख, आमदार प्रकाश गजभिये यांनी गुरूवारी ऑरेंज सिटी रुग्णालयात पिडीताच्या प्रकृतीची डॉक्टरांकडून विचारपूस केली. नातेवाईकांशी बोलून त्यांनी घटनेची माहिती घेत त्यांना धिर दिला. दुपारी केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनीही ऑरेंज सिटी रुग्णालयात पिडीताची पाहणी करत त्यांच्या कुटुंबाची भेट घेतली. सरकार दोषींवर कडक कारवाई करणार असल्याचे सांगत त्यांनी  उपचारात कोणतीही कमी होवू देणार नसल्याचे आश्वासन दिले.

उमरेडमध्ये कडकडीत बंद

एका तरुणीवर बलात्कार करून तिच्या खुनाचा प्रयत्न झाल्यानंतर उमरेडमधील सर्व  राजकीय पक्षांनी एकत्र येऊन वेकोलिविरुद्ध मोर्चा काढून बंद पाडण्यात आला. त्याला स्थानिक लोकांनी चांगला प्रतिसाद दिला असून वेकोलिकडून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी कोणतीही उपाययोजना नाही. शिवाय वजनकाटय़ावर महिलांची नोकरी लावणे चुकीचे आहे. त्या परिसरातील वाहनचालक व क्लिनर काम करीत असून महिला कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका असतो. त्यासंदर्भात पदाधिकाऱ्यांनी वेकोलिला निवेदन सादर केले. यावेळी पोलिसांचा चोख बंदोबस्त होता.

प्राथमिकदृष्टय़ा वेकोलिचा व्यवस्थापक दोषी

या प्रकरणात वेकोलिचा स्थानिक व्यवस्थापक दोषी असल्याचे  प्राथमिक दृष्टय़ा दिसत आहे. त्यांच्याकडून महिला कर्मचाऱ्यांच्या सुरक्षेसाठी पर्याप्त सुरक्षेचे उपचार तेथे केले नसल्याचे माझ्या खाण परिसरातील निरीक्षणात पुढे आले. पर्याप्त सुरक्षा नसलेल्या भागातून महिलांना काढून योग्य कामे देण्यास सांगितले आहे.या प्रकरणात दोषी अधिकाऱ्यांची जबाबदारी निश्चित केली जाईल. त्यानंतर संबंधितांवर कारवाई करू, असे मत केंद्रीय गृहराज्यमंत्री हंसराज अहिर यांनी लोकसत्ताशी बोलतांना व्यक्त केले.