सिंधुदुर्ग जिल्हा परिषद रस्त्यांना ठिकठिकाणी खड्डे पडल्याने लोकांत प्रचंड नाराजी आहे. निधीअभावी रस्त्यांची दुरुस्ती सुमारे १० वर्षे रखडली आहे. त्यामुळे जिल्ह्य़ातील सुमारे १०० रस्ते सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आले आहेत. मात्र अद्याप सार्वजनिक बांधकाम खात्याच्या ताब्यात हे रस्ते देण्यात आले नसल्याने खड्डय़ातून मुक्ती पावसाळ्यानंतर मिळेल, असे सांगण्यात आले. सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेकडील ग्रामीण रस्ते किमान पाच वर्षांनी दुरुस्ती करणे आवश्यक असते. शिवाय हल्ली निकृष्ट दर्जाच्या कामामुळे रस्ते लवकर खराब होतात. त्यामुळे डांबरीकरण झालेल्या रस्त्यावर भले मोठे खड्डे लोकांना अनुभवावे लागतात. जिल्हा परिषदेला रस्त दुरुस्तीसाठी निधीच मिळत नसल्याने गोची झाली आहे. त्यामुळे निधी असणाऱ्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे रस्ते वर्ग करण्याचा निर्णय सिंधुदुर्ग जिल्हा परिषदेने घेतला आहे.  सिंधुदुर्ग जिल्ह्य़ातील १०० रस्ते राज्य शासनाच्या सार्वजनिक बांधकाम खात्याकडे वर्ग करण्यात आले. जिल्हा परिषदेने सध्या गटारातील मातीने खड्डे बुजविण्याचे काम सुरू ठेवले आहे. त्यामुळे जनतेत प्रचंड नाराजी आहे. सावंतवाडी तालुक्यात रस्तेदुरुस्तीसाठी पूरहानीतून १० कोटी व अन्य योजनेतून ११ कोटी ८६ लाखांची मागणी केली गेली, पण निधीच मिळाला नाही. त्यामुळे मातीने खड्डे बुजविण्याच्या कामावर जिल्हा परिषद बांधकाम खात्याने जोर दिला आहे. रस्ते खड्डेमय असल्याने वाहनधारकांना कमालीची कसरत करीत अपघातांना सामोरे जावे लागत आहे. वाहनांची नुकसानीही होत आहे.