बुधवारी भुईगावच्या समुद्रात तरंगणारी चारचाकी गाडी दिवसभर चर्चेचा विषय ठरली होती. कळंब समुद्रकिनारी फिरायला आलेल्या तरुणाची गाडी भरतीच्या पाण्यात वाहून गेली आणि कळंब समुद्रकिनाऱ्यावरून ती थेट भूईगावला पोहोचली.  या गाडीला बाहेर काढण्याचे प्रयत्न बुधवारी उशिरापर्यंत सुरू होते.

वसई पश्चिमेच्या विविध किनाऱ्यांवर विविध रिसॉर्ट्स आणि लॉजेस आहेत. अनेक जोडपी येथे येत असतात. मंगळवारी  एक तरुण आपल्या मैत्रिणीसह कळंबमधील एका रिसॉर्टमध्ये आला होता. त्याने आपली स्विफ्ट ही चारचाकी कळंब समुद्रकिनाऱ्यावर उभी केली होती. बुधवारी सकाळी तो बाहेर आल्यानंतर त्याला आपली गाडी न दिसल्याने तो हादरला आणि गाडीचा शोध सुरू झाला. काही वेळाने ही गाडी भुईगाव समुद्रकिनाऱ्यावर दिसली. ही गाडी समुद्रकिनाऱ्यापासून सुमारे पाचशे मीटर आत तरंगत होती. यामुळे सर्वानाच धक्का बसला.

स्थानिकांनी तात्काळ याबाबत वसई पोलिसांना, अग्निशमन दलाला कळविले असता घटनास्थळी येऊन त्यांच्या चारचाकीला काढण्यासाठी प्रयत्न सुरू झाले. चारचाकी वाळूमध्ये फसली असल्याने तिला बाहेर काढणे जिकिरीचे होत आहे. या गाडीला ट्रॅक्टर, दोरीच्या साहाय्याने पाण्याबाहेर काढण्याचे प्रयत्न सुरू होते. ही गाडी कळंब समुद्रकिनाऱ्यावर तरुणाने उभी केली होती. ती भरतीच्या पाण्याने वाहून गेल्याचे वसई पोलिसांनी सांगितले.