धुरामुळे लगतच्या मोरेकुरण गावातील नागरिकांच्या आरोग्याला धोका; सरपंचासह गावकरी एकवटले

लोकसत्ता वार्ताहर

पालघर : पालघर नगर परिषदेच्या कचराभूमीतून अपूर्ण जळालेल्या कचऱ्याच्या दरुगधीयुक्त धुरामुळे लगतच्या मोरेकुरण ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. त्यामुळे गावातील सरपंच, सदस्य व नागरिकांनी एकत्र येत कचराभूमीवर जाणाऱ्या कचरागाडय़ा रोखून धरल्या.

मोरेकुरण ग्रामपंचायतला लागून असलेल्या नगर परिषदेच्या याच कचराभूमीला काही दिवसांपूर्वी मोठी आग लागली होती. शर्थीचे प्रयत्न करून ती विझवली असली तरी अर्धवट जळालेल्या कचऱ्यातून दरुगधीयुक्त धूर पालघर शहरासह मोरेकुरण ग्रामपंचायत व लगतच्या परिसरात पसरला होता. मात्र अर्धवट जळलेला कचरा विझतच नसल्याने या दरुगधीच्या धुराने मोरेकुरण नागरिक त्रस्त झाले होते.

नागरिकांना खोकला, कफ, श्वसन विकार, डोळे चरचरणे, मळमळणे, धूर सहन न झाल्याने उलटय़ा होणे असे आजार बळावू लागल्याच्या तक्रारी पुढे येऊ लागल्याने येथील नागरिकांच्या आरोग्याला मोठा धोका उद्भवू लागला. कचराभूमीत उकिरडा साचल्याने त्यावर बसलेल्या माशा गावात येऊन त्या अन्नावर नागरिकांच्या शरीरावर बसत असल्याने तसेच, मोठय़ा प्रमाणात डासांचा वावर यामुळेही गावातील आरोग्य धोक्यात आहे, असे सांगितले जात आहे.

नगर परिषद प्रशासन या कचराभूमीतील धूर बंद करण्यास असमर्थ असल्याने नागरिकांनी संताप व्यक्त केला. या कचराभूमीजवळ ग्रामपंचायतच्या सरपंचासह सदस्य व मोठय़ा संख्येच्या ग्रामस्थांनी बंड पुकारत या कचराभूमीवर जाणाऱ्या कचऱ्याच्या गाडय़ाच रोखून धरल्या. त्यामुळे या गाडय़ांची मोठी रांग रस्त्यावर उभी राहिली. जोवर या धुरावर तोडगा काढणार नाही तोवर गाडय़ा सोडणार नाही अशी ठाम भूमिका ग्रामस्थांनी घेतली.

मुख्याधिकाऱ्यांच्या आश्वासनानंतर आंदोलन मागे

गाडय़ा रोखून धरल्यानंतर नगर परिषदेच्या मुख्याधिकारी यांनी घटनास्थळी पोहोचून ही आग पूर्णपणे विझवली जाईल असे आश्वासन देऊन या कचराभूमीवर अग्निशमन बंबासह दोन पाण्याचे टँकर आग पूर्णपणे विझेपर्यंत ठेवण्यात येतील, असे आश्वासन दिल्यानंतर हे आंदोलन मागे घेण्यात आले.

पालघर नगर परिषदेच्या कचराभूमीतून अपूर्ण जळालेल्या कचऱ्याच्या दरुगधीयुक्त धुरामुळे लगतच्या मोरेकुरण ग्रामपंचायत हद्दीतील नागरिकांनी सरपंच व पदाधिकऱ्यांना सोबत घेऊन कचरा नेणाऱ्या गाडय़ा आडवल्या.

कचराभूमीतून निघणाऱ्या दरुगधीयुक्त धुरामुळे गावातील लहानांपासून ज्येष्ठांच्या आरोग्याचा प्रश्न गंभीर बनला आहे. नगर परिषद कचरा व्यवस्थापन योग्य पद्धतीने करीत नसल्याने गावाला त्याचा त्रास सहन करावा लागत आहे.

– अजित संखे,सदस्य, मोरेकुरण ग्रा.पं.

दोन अग्निशमन बंबासह तीन पाण्याचे टँकर आणून अर्धवट जळत असलेला कचरा विझविण्यात येत आहे. त्यामुळे धूर येणे बंद होईल.

– स्वाती देशपांडे-कुलकर्णी, मुख्याधिकारी, पालघर न.प.