निखिल मेस्त्री, लोकसत्ता

पालघर : टाळेबंदीदरम्यान जप्त करण्यात आलेली वाहने  त्यांच्या मालकांना परत देण्यास सुरवात झाली आहे. अजूनही काही वाहने देणे प्रलंबित आहे.

पालघर जिल्ह्यतील करोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता जिल्हाधिकारी डॉ. कैलास शिंदे यांनी १ एप्रिलपासून संपूर्ण जिल्हाबंदीचे आदेश देऊन या दरम्यान रुग्णालयीन समस्यावगळता कोणत्याही प्रकारच्या खाजगी, दुचाकी, तीनचाकी, चारचाकी वाहनांना बंदी घातली होती. त्यानुसार पालघर पोलिसांनी या काळात कडेकोट बंदोबस्त तैनात केला आणि विनाकारण वाहने रस्त्यावर चालवणाऱ्यांची वाहने जप्त केली.

पालघर जिल्ह्यतील २३ पोलीस ठाण्यांमधून सुमारे ५४९७ वाहने जप्त करण्यात आली होती. यामध्ये सर्वाधिक ५२७९ दुचाकी वाहने, ५६ तीन आसनी, १३८ चारचाकी वाहने व २४  ट्रकचा समावेश आहे.

मात्र आता तब्बल दीड महिन्यानंतर ही वाहने वाहन मालकांना विविध पोलीस ठाण्यामार्फत सुपूर्द करण्यास सुरवात झाली आहे. वाहनचालकांनी त्यांना दिलेल्या दिवशी, दिलेल्या वेळेत गाडय़ा घेऊन जाण्यासंबंधी संदेश मोबाइलवर प्राप्त करून देण्यात आला आहे. टप्प्याटप्प्याने ही वाहने वाहनचालकांना परत करण्यात येत आहेत.

पोलीस ठाण्यात गाडय़ा घेण्यास येणाऱ्या वाहनचालकांनी आपल्या वाहनांच्या कागदपत्रांची छायांकित प्रत सोबत घेऊन येण्यास सांगितले जात असून गाडीची ओळख पटवून ती घेऊन जावे, असे आवाहन पोलीस ठाण्यांनी केले आहे. ही वाहने घेऊन जाण्यासाठी येत असताना सामाजिक अंतरासंबंधीच्या नियमांचे पालन करावे, असेही आवाहन पोलीस ठाण्याने केले आहे.