करोना प्रादूर्भावाच्या पार्श्वभूमीवर सुमारे दोन महिन्यांच्या खंडानंतर सुरू करण्यात आलेल्या जिल्हांतर्गत एस टी प्रवासाला शुक्रवारी अतिशय कमी प्रतिसाद मिळाला.

शासकीय मार्गदर्शक तत्त्वांनुसार २२ प्रवासी असलेल्या एसटी गाडय़ांच्या ५२ फेऱ्या जिल्ह्याच्या विविध भागात शक्रवारपासून सोडण्याचे नियोजन करण्यात आले होते.  पण गाडीत २२ प्रवाशांचा कोटा पूर्ण न झाल्यामुळे दिवसभरात जिल्ह्यातील विविध एस टी आगारांमधून एकूण फक्त १८ फेऱ्या सायंकाळपर्यंत रवाना झाल्या. काही ठिकाणी कमी प्रवासी असतानाही गाडय़ा सोडण्याचा निर्णय प्रशासनाकडून घेण्यात आला.

करोनामुळे केलेल्या टाळेबंदीच्या नियमातील शिथिल धोरणानुसार शुक्रवारपासून जिल्हांतर्गत बससेवा आणि रिक्षा प्रवासी वाहतूक सुरु झाली. प्रवासी क्षमतेच्या ५० टक्के मर्यादेत जिल्ह्यात एका ठिकाणावरून दुसऱ्या ठिकाणी बससेवा सुरू करता येईल, असे आदेशात स्पष्ट करण्यात आले. त्यानुसार एसटी महामंडळाने परवानगी घेऊ न जिल्ह्यात ३२ मार्गावर एसटीच्या ५२ फेऱ्यांचे नियोजन केले; परंतु प्रत्यक्षात गाडय़ा सुरु करण्यासाठी प्रशासनाला अनेक अडचणींना तोंड द्यावे लागले. निश्चित केलेल्या मार्गावर २२ प्रवासी उपलब्ध असतील तरच ती बस सोडावी, अशा सूचनांचे फलक प्रत्येक बसस्थानकात लावण्यात आले होते. दुपारपर्यंत प्रवासी संख्येचा मेळ बसत नसल्यामुळे अनेक ठिकाणी एसटी गाडी धावलीच नाही. रत्नागिरी बसस्थानकातही तीच परिस्थिती होती. त्यावर उपाय म्हणून कमी प्रवासी असतानाही रत्नागिरीतून गाडय़ा सोडण्यात आल्या. करोनाचा प्रादुर्भाव रोखण्यासाठी मास्कसक्ती, सॅनिटायझर, शारीरिक अंतर इत्यादी बाबींचे सक्तीने पालन करण्यात आले.

’ रेल्वे मंत्रालयाने काही रेल्वे गाडय़ा सुरु करण्याचा निर्णय घेतला आहे. त्यात तीन गाडय़ा कोकण रेल्वे मार्गावरुन धावणार आहेत. त्यासाठी शुक्रवारपासून विविध शहरातील पीआरएस (पब्लिक रिझव्‍‌र्हेशन सिस्टीम) केंद्र सुरू करण्यात आली आहेत. त्यात माणगाव, खेड, चिपळूण, रत्नागिरी, कणकवली, कुडाळ, सावंतवाडी, थिविम, करमाळी, मडगाव, कारवार, उडप्पी, कुमटा बेंदूर येथील कोकण रेल्वेचे काउंटर सुरू झाली आहेत. महाराष्ट्रात आंतरजिल्हा प्रवास करण्याची मुभा नाही. त्यामुळे रत्नागिरीतून पराज्यात जाणाऱ्यांना याचा लाभ मिळणार असल्याचे रेल्वे प्रशासनाकडून सांगण्यात आले. महाराष्ट्रातील कोणत्याही जिल्ह्यातून दुसऱ्या राज्यात जाण्यासाठी नेहमीप्रमाणेच तिकिटांचे आरक्षण करता येणार आहे.