खडी, चिरेखाण व वाळू व्यवसायबंदीबाबत लवकरच सकारात्मक निर्णय होईल, असे आश्वासन राज्याचे मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण यांनी दिले आहे. यासाठी केंद्रीय स्तरावर पंतप्रधान डॉ. मनमोहन सिंग यांची भेट घेतल्याचेही त्यांनी या वेळी सांगितले.
शुक्रवारी मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण, काँग्रेस प्रदेशाध्यक्ष आ. माणिकराव ठाकरे यांच्याशी काँग्रेस जिल्हाध्यक्ष रमेश कीर यांनी व्हिडीओ कॉन्फरन्सिंगमार्फत थेट संवाद साधला. या वेळी काँग्रेसचे जिल्हा आणि शहर पदाधिकारी उपस्थित होते. जिल्हाध्यक्ष कीर यांनी रत्नागिरी जिल्ह्य़ातील सर्वसामान्यांशी निगडित प्रश्न या वेळी उपस्थित केले. या सर्वच प्रश्नांना मुख्यमंत्री आणि प्रदेशाध्यक्षांनी समाधानकारक उत्तरे दिली. चिरेखण व वाळू व्यवसाय बंद झाल्यामुळे जिल्ह्य़ातील रोजगार बंद झाला असून, लोकांमध्ये प्रचंड नाराजी असल्याचे कीर यांनी मुख्यमंत्र्यांना सांगितले. हरियाणा उच्च न्यायालय आणि सवरेच्य न्यायालयाच्या निर्णयामुळे अडचण निर्माण झाली आहे. मात्र याबाबत आपण स्वत: पंतप्रधानांची भेट घेतली असून, केंद्रीय पर्यावरणमंत्री जयंती नटराजन आणि विषयाशी संबंधित समितीचे अध्यक्ष कस्तुरी रंगनाथन यांच्याशी चर्चा झाली असून, यातून लवकरच मार्ग निघेल, असे त्यांनी सांगितले.
डिझेल दरवाढीमुळे मच्छीमारी व्यवसायावर परिणाम होत असून हा व्यवसाय पूर्णत: बंद आहे. यामुळे मच्छीमारांमध्ये तीव्र संताप आहे, असे या वेळी कीर यांनी सांगितले असता प्रदेशाध्यक्ष ठाकरे यांनी याचे उत्तर दिले. ते म्हणाले की, या प्रश्नाबाबत केंद्रीय पेट्रोलियममंत्री विरप्पा मोईली यांच्याशी चर्चा झाली असून, काँग्रेस उपाध्यक्ष आणि खासदार राहुल गांधी यांनीही या विषयात लक्ष घातले आहे. याबाबत लवकरच निर्णय होईल, असे ठाकरे यांनी या वेळी स्पष्ट केले. गुहागर, दापोली व रत्नागिरी तालुक्यांतील   पर्यटन व्यवसायासाठी मूलभूत पायाभूत सुविधा नाहीत, त्यामुळे पर्यटक कोकणात येत नाहीत, असे कीर यांनी या वेळी मुख्यमंत्र्यांना सांगितले. यासाठी स्वतंत्र निवेदन द्या, असे सांगताना रत्नागिरी जिल्ह्य़ातील पर्यटन विकासासाठी स्वतंत्र बैठक घेऊन निर्णय घेऊ, असे त्यांनी सांगितले.
मुंबई-गोवा राष्ट्रीय महामार्गावरील वडखळ ते सावंतवाडी या भागात अपघातांचे प्रमाण सातत्याने वाढत आहेत याची दखल घेऊन मुख्यमंत्र्यांनी या मार्गाच्या चौपदरीकरणाचा प्रस्ताव आला असल्याचे सांगितले.
आंबा बागायतदारांना मिळणाऱ्या नुकसानभरपाईच्या निर्णयातील त्रुटी दूर करून बागायतदारांना लवकरच भरपाई मिळेल अशी व्यवस्था केली जाईल. तसेच १२वीच्या परीक्षेवर बहिष्कार टाकण्याचा कनिष्ठ महाविद्यालयातील शिक्षकांनी निर्णय घेतला असला तरी यामध्ये आपण स्वत: लक्ष घालून विद्यार्थ्यांची अडचण होऊ देणार नाही, असेही या वेळी मुख्यमंत्र्यांनी सांगितले.
या वेळी राजापूरचे माजी आमदार गणपत कदम, संगमेश्वरचे माजी आमदार सुभाष बने, दापोलीचे तालुकाध्यक्ष अ‍ॅड. विकास मेहता, खेडचे महेंद्र भोसले, गुहागरचे प्रदीप बेंडल, संगमेश्वरचे शंकर शेटय़े, रत्नागिरीचे नाना मयेकर, लांजाचे  सचिन माजळकर, राजापूरचे  रवींद्र नागरेकर, रत्नागिरीचे शहराध्यक्ष दीपक राऊत, जिल्हा सरचिटणीस विलास चाळके, समीर झारी, चिटणीस मधुकर शिंगे, प्रसाद उपळेकर, राजू भाटलेकर, कपिल नागवेकर, नंदू साळवी, काका तोडणकर आदी पदाधिकारी उपस्थित होते.