अलिबाग तालुक्यातील वेश्वी ग्रामपंचायतीच्या हद्दीतील जनसुविधा योजनेतून मंजूर झालेल्या कामाचा कार्यारंभ आदेश देण्यास टाळाटाळ करणाऱ्या वेश्वी ग्रामपंचायतीचा निषेध करण्यासाठी वेश्वी ग्रामस्थांनी मंगळवारी जिल्हाधिकारी कार्यालयासमोर एक दिवसाचे लाक्षणिक उपोषण केले.

काँग्रेसचे अलिबाग तालुका चिटणीस योगेश मगर यांच्यासह मनोज भितळे, सुधीर वेंगुल्रेकर, चारुहास मगर, मंगेश माळी लाक्षणिक उपोषणाला बसले होते.

रायगड जिल्हा कॉंग्रेस अध्यक्ष आर. सी. घरत, उपाध्यक्ष म. हि. पाटील, रायगड जिल्हा महिला कॉंग्रेस अध्यक्षा अ‍ॅड. श्रद्धा ठाकूर, राष्ट्रवादी कॉंग्रेसचे नेते विजय कावळे, युवक कॉंग्रेसचे रायगड लोकसभा मतदारसंघ अध्यक्ष अ‍ॅड. उमेश ठाकूर, अ‍ॅड. प्रथमेश पाटील, वैभव पाटील, रवींद्र पाटील, श्रीमती मगर, अ‍ॅड. प्राजक्ता माळी,  विनीता महाडिक यांनी उपोषणकर्त्यांची भेट घेऊन पाठिंबा दिला.

जनसुविधा योजनेअंतर्गत गोकुळेश्वर तलावाजवळील संरक्षण िभत व पर्यायांचे बांधकाम करणे या कामाच्या मंजुरीसाठी सातत्याने पाठपुरावा केला. या पाठपुराव्यामुळे जिल्हा नियोजन समितीच्या बठकीत जनसुविधा योजनेतून गोकुळेश्वर तलावातील या कामासाठी अकरा लाख रुपयांचा निधीही मंजूर करण्यात आला आहे. हा निधी जिल्हाधिकारी पातळीवरून ग्रामपंचायत स्तरापर्यंत येण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालय ते ग्रामपंचायत कार्यालयापर्यंत पाठपुरावा केला. त्यामुळे हा अकरा लाखांचा निधी ग्रामपंचायतीच्या ग्रामनिधीमध्ये जमा झाला. या कामाचे ग्रामपंचायतीने रीतसर ऑनलाइन पद्धतीने ई-टेंडरिंग केले, परंतु काम मंजूर होऊन सात महिने उलटून गेले तरी वेश्वी ग्रामपंचायतीचे सरपंच, ग्रामसेवक यांनी जाणुनबुजून ज्या संस्थेला हे काम मिळाले आहे त्या श्री हरिस्मृती मजूर सरकारी संस्थेला कार्यारंभ आदेश दिलेला नाही त्यामुळे आम्ही हे उपोषण केले, असे योगेश मगर यांनी सांगितले.