स्वातंत्र्यदिनानिमित्त स्वातंत्र्य सैनिकाने जागविल्या आठवणी
इंग्रज अधिकारी भारतीयांना सातत्याने त्रास देत असल्याने त्यांच्या राजवटीला सर्वसामान्य जनता वैतागली होती.. इंग्रजांबद्दलचा संताप व देशप्रेम मनात घेऊन आम्ही काही तरुण देश कार्याला मदत करण्यासाठी एकत्र झालो.. १९४२ च्या लढय़ानंतर बारामतीमधून आम्ही तरुणांनी मोर्चा काढला होता.. इंग्रजांना धडा शिकवण्याचा निर्णय आम्ही घेतला होता. त्यातूनच बारामती रेल्वे स्थानकावर इंग्रज अधिकाऱ्यांच्या अंगावरील कपडे फाडले अन् त्यांना खादीचे कपडे आणि गांधी टोपी घालण्यास भाग पाडले. इतकेच नव्हे, तर ‘वंदे मारतम्’ही म्हणण्यास भाग पाडले..
..देशाच्या स्वातंत्र्यदिनाच्या निमित्ताने बारामती तालुक्यातील डोर्लेवाडी येथील ज्येष्ठ स्वातंत्र्यसैनिक साहेबराव कोंडिबा दळवी यांनी स्वातंत्र्य लढय़ातील या आठवणी जागविल्या. दळवी यांचे वय आज ९६ वर्षे आहे. त्यांनी सांगितलेल्या घटनेला आता सत्तर वर्षांहून अधिक काळ उलटून गेला असला तरी ती सर्व घटना आजही जशीच्या तशी त्यांच्या स्मरणात आहे. इंग्रज अधिकारी नागरिकांवर करीत असलेल्या अन्यायाच्या घटनाही ते सांगतात.
बारामतीतील घटनेबाबत त्यांनी सांगितले, की ‘‘बारामतीत तरुणांनी काढलेल्या मोर्चामध्ये वर्धमानभाई कोठारी व विलासभाई कोठारीही होते. इंग्रजांना धडा शिकवायचा चंग आम्ही बांधला होता. त्यासाठी बारामतीमधील त्या वेळच्या सागर खादी भांडारमधून खादीचे कपडे आणि गांधी टोपी खरेदी केली होती. इंग्रज अधिकाऱ्यांचे कपडे फाडून व मोठा दबाव निर्माण करून आम्ही त्यांना खादीचे कपडे व गांधी टोपी घालण्यास भाग पाडले. मात्र, या घटनेमुळे इंग्रज अधिकारी चांगलेच संतापले होते. बारामतीच्या चौकात अधिकाऱ्यांनी आम्हाला अडविले व काठीने मारही दिला. त्यानंतर आमच्यावर खटलेही भरण्यात आले. आम्ही सर्वजण अल्पवयीन असल्याने न्यायालयातून आमची सुटका करण्यात आली.’’
साहेबराव दळवींचा जन्म १७ ऑक्टोबर १९२० मध्ये झाला. आज या वयातही त्यांच्या बोलण्यातून देशप्रेम झळकते. स्वातंत्र्यदिन व प्रजासत्ताकदिनाच्या कार्यक्रमात कोठेही ते आवर्जून उपस्थित असतात. स्वातंत्र्य सैनिकांसाठीचे मानधनही त्यांना मिळते. आजही ते खादीचे कपडे आवडीने वापरतात.