News Flash

ज्येष्ठ पत्रकार अनंत दीक्षित यांचे निधन

त्यांच्या मागे पत्नी आणि कन्या असा परिवार आहे

संग्रहित छायाचित्र

ज्येष्ठ पत्रकार आणि संपादक अनंत भगवान दीक्षित (वय ६७) यांचे दीर्घ आजाराने सोमवारी सायंकाळी खासगी रुग्णालयात निधन झाले. त्यांच्या मागे त्यांची पत्नी आणि कन्या असा परिवार आहे.

गेल्या चार दशकांहून अधिक काळ पत्रकारितेत असलेल्या दीक्षित यांनी ‘सकाळ’च्या कोल्हापूर आवृत्तीचे आणि त्यानंतर पुणे आवृत्तीचे संपादक म्हणून काम पाहिले. ‘लोकमत’च्या पुणे आवृत्तीचे ते काही काळ संपादक होते. निवृत्तीनंतर विविध वृत्तवाहिन्यांवर राजकीय विश्लेषक या नात्याने ते परखड भूमिका मांडत असत. दीक्षित यांच्या ललित लेखनाची पुस्तके प्रकाशित झाली असून त्यांना विविध पुरस्कारांनी सन्मानित करण्यात आले होते.

 

दीक्षित सरांचे शेवटचे पत्र, कोल्हापूरसाठी 

ता. 22-11-2019

कोल्हापूरकराना पत्र

सर्व मित्रांना
स.न.
आपल्याशी संवाद साधण्यासाठी हा पत्रप्रपंच आहे. सतत कोल्हापूरची आठवण येते. लोकही मनापासून प्रकृतीची चौकशी करतात. अलीकडे माझ्या मनाने हळवेपणाचा सूर पकडलेला दिसतो. प्रकृती आणि त्यामुळे येणारे क्षण फार विचित्र असतात. एक दिवसाआड डायलिसिस सुरू आहे. अलोपॅथी आणि होमिओपॅथी असा कार्यक्रम सुरू आहे. ज्यादिवशी डायलिसिस सुरू असते त्यादिवशी आणि त्याच्या दुसऱ्या दिवशी बराच त्रास होतो. त्रासाचा अटळ भाग म्हणून अंथरुणावर पडून रहावे लागते. प्रकृतीची क्षीणता एवढ्या टोकाला गेली आहे की, नव्याने किंवा पूर्वीप्रमाणे वाचन अशक्य झाले आहे. मेंदूला कोणतेही ओझे अजिबात चालत नाही. त्यामुळे जो जीवनक्रम आहे, त्यात दुःखसंपन्नता आहे. म्हणजे मी हतबल झालो आहे असे नव्हे. कुटुंबाची म्हणजे माझी पत्नी सौ. अंजलीची साथ देण्याची धमक अपूर्व आहे. जीवनाच्या गाभ्याविषयी तिला असलेली समज माझ्यापेक्षा कितीतरी पुढची आहे. सतत कोणता ना कोणता तरी विचार करण्याची सवय मला अडचणीची ठरली आहे. विचार करण्याने मनाच्या गरजा हा पैलू माझ्या कधी लक्षातच आला नाही. मन मारणे चांगले नाही, मनाला विवेकाची साथ आवश्यक आहे हे खरे असले तरी आत्मनियंत्रण सैल झाल्यास कठीण स्थिती येते. कळते पण वळत नाही ही ती स्थिती होय. माझ्या मुलीच्या म्हणजे अस्मिताच्या मृत्यूनंतर प्रत्येक क्षणी अंतःकरणात प्रचंड अस्वस्थतता असते. कित्येकांना मी आधार दिला पण माझे दुःख मला झेपत नाही. अशावेळी जुन्या आठवणी, मैत्री नजरेसमोर उभी राहिली की मी अनावर होतो. शारिरिक त्रास असा असतो की, जेव्हा शरीर कासावीस असते तेव्हा तो त्रास सांगायला आवश्यक असलेली पूर्णता हरवून जातो. मानसिक त्रासाचे स्वरूप असे असते की,पोटात कालवाकालव होते. तरीही माझ्या पत्नीच्या जिद्दीवर वाटचाल सुरू आहे. तिलाही गुडघेदुखीचा त्रास आहे. माझी थोरली मुलगी अमृता आणि नात चार्वी स्कॉटलंडला असते. ती दररोज मला फोन करत असते. तिची घनव्याकुळता आपण सर्वजण समजू शकता. या सगळया वातावरणात वाचनात पडलेला खंड आणि लोकांमधली उठबस संपल्याचे शल्य टोकदार आहे.

आपला,
अनंत दीक्षित

२२ नोव्हेंबर २०१९ रोजी त्यांनी हे पत्र कोल्हापूरकरांना उद्देशून लिहिले होते. तेच त्यांचे अखेरचे पत्र ठरले.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on March 9, 2020 8:32 pm

Web Title: veteran journalist anant dixit passes away scj 81
Next Stories
1 Corona virus – चीनसारखं रुग्णालय उभारण्यास आपल्याला तीन वर्षे लागली असती: अजित पवार
2 करोनाचा धसका :औरंगाबाद मनपाची निवडणूक पुढे ढकला, एमआयएमची मागणी
3 ५० वर्षीय शिक्षकाचे सहावीच्या विद्यार्थिनीसोबत अश्लील चाळे, जमावाने बेदम चोप देत गाठलं पोलीस स्टेशन
Just Now!
X