ज्येष्ठ साहित्यिक मधु मंगेश कर्णिक (वय ८९) यांनी कोविड-१९ आजारावर यशस्वीरित्या मात केली आहे. करोनाची लागण झाल्याचे निष्पण्ण झाल्यानंतर त्यांना २१ ऑगस्ट रोजी उपचारांसाठी अंधेरीच्या कोकिळाबेन रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. कर्णिक यांच्यावर यापूर्वी बायपास शस्त्रक्रिया झाली आहे. मात्र, डॉक्टरांनी अथक प्रयत्नांनी त्यांना करोनाच्या संकटातून बाहेर काढले, त्यामुळे कर्णिक पूर्णपणे बरे होऊन घरी परतले आहेत.

उपचारांसाठी रुग्णालयात दाखल होण्यापूर्वी ते ‘प्राप्तकाल’ ही कादंबरी लिहित होते. करोनाच्या आजारामुळं त्यांच्या या कामात खंड पडला होता. मात्र, आता ते पूर्णपणे बरे होऊन घरी परतल्याने लवकरच ही कादंबरी लिहून पूर्ण करु असा विश्वास त्यांनी व्यक्त केला आहे.

शासकीय आणि नागरी यंत्रणांचं काम चांगलं

करोनाबाधित रुग्णांना बरं करण्याची क्षमता आपल्या डॉक्टरांमध्ये आहे. त्याचबरोबर शासकीय आणि नागरी यंत्रणा यासाठी चांगल्याप्रकारे काम करीत आहेत. त्यामुळे रुग्णांनी घाबरुन जाऊ नये, असे आवाहन मधु मंगेश कर्णिक यांनी केले आहे.

करोनाच्या नियमांचे कडक पालन करा

करोनाच्या धोक्यापासून वाचण्यासाठी फिजिकल डिस्टंसिंग पाळणे, मास्क वापरणे आणि हात धुणे ही त्रिसुत्री प्रत्येकाने कटाक्षाने पाळावी, असे आवाहनही कर्णिक यांनी जनतेला केले आहे.

दरम्यान, मधु मंगेश कर्णिक यांना आणखी महिनाभर कोणीही संपर्क करण्याचा प्रयत्न करु नये, अशी विनंती त्यांच्या कुटुंबियांतर्फे अनुप कर्णिक यांनी केली आहे.