प्रसिद्ध ज्येष्ठ संगीत दिग्दर्शक खय्याम यांना प्रकृती अस्वास्थ्यामुळे रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. फुफ्फुसाच्या त्रासाने प्रकृती बिघडल्यामुळे त्यांना जुहू येथील सुजॉय रुग्णालयामध्ये हलवण्यात आलं आहे. सध्या त्यांना अतिदक्षता विभागामध्ये ठेवण्यात आलं आहे.

९२ वर्षांचे खय्याम यांनी आतापर्यंत बॉलिवूडमधील अनेक गाण्यांचं दिग्दर्शन केलं असून ‘कभी कभी’, ‘उमराव जान’, ‘फिर सुबह होगी’, ‘रजिया सुलतान’ अशा गाजलेल्या चित्रपटांना त्यांनी संगीत दिलं आहे. ख्ययाम यांचा सामाजिक क्षेत्रातही मोठा सहभाग आहे. त्यांनी त्यांच्या ९० व्या वाढदिवसानिमित्त १२ कोटींची रक्कम खय्याम प्रदीप जगजीत या संस्थेला दिली होती.

दरम्यान, पंजाबमधील नवांशहर येथे जन्म झालेल्या खय्याम यांनी १९४७ साली करिअरची सुरुवात केली. २०० रुपयांची पहिली कमाई करणाऱ्या खय्याम यांना ‘कभी कभी’ आणि ‘उमराव जान’ या चित्रपटासाठी फिल्मफेअर पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.