ज्येष्ठ कवी आणि साहित्यिक प्रा. श्रीधर कृष्ण शनवारे यांचे रविवारी दुपारी निधन झाले. ते ७८ वर्षांचे होते. त्यांच्या पश्चात पत्नी, दोन मुली आणि बराच मोठा आप्त परिवार आहे.
गेल्या अनेक दिवसांपासून ते आजारी होते. आठ दिवसांपूर्वी त्यांना खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. त्यांच्यावर उपचार सुरू असताना रविवारी दुपारी त्यांचे निधन झाले. प्रा. शनवारे यांच्या निधनाने साहित्य वर्तुळात शोककळा पसरली असून अनेक ज्येष्ठ आणि नवोदित साहित्यिकांनी त्यांच्या गोकुळपेठमधील निवासस्थानी जाऊन अंत्यदर्शन घेतले. अंबाझरी घाटावर त्यांच्या पार्थिवावर अंत्यसंस्कार करण्यात आले. यावेळी साहित्य, शैक्षणिक आणि सामाजिक क्षेत्रातील मान्यवर उपस्थित होते.
प्रा. श्रीधर शनवारे यांचा जन्म ५ ऑक्टोबर १९३५ रोजी झाला. येथील धनवटे नॅशनल महाविद्यालयात सुमारे ३५ वर्षे त्यांनी अध्यापन केले. १९९५ मध्ये सेवानिवृत्त झाल्यानंतर त्यांनी शेवटपर्यंत साहित्य आणि काव्यलेखन केले. विदर्भ साहित्य संघातर्फे १९९६ मध्ये दर्यापूरला आयोजित करण्यात आलेल्या साहित्य संमेलनाचे अध्यक्षपद त्यांनी भूषविले होते. त्यांच्या नऊ काव्यसंग्रहांसह कथा, समीक्षणात्मक आणि अनुवादात्मक अशी १६ पुस्तके प्रकाशित झाली. ‘आतून बंद बेट’ हा कवितासंग्रह नागपूर विद्यापीठाच्या अभ्यासक्रमात समाविष्ट करण्यात आला. शरच्चंद्र चटोपाध्याय यांच्या ‘रामेर’ या कथेचा नाटय़ाविष्कार करून ‘अतूट’ हे नाटक त्यांनी लिहिले. या मूळ बंगाली कथेला मराठी नाटकाचा देखणा साज त्यांनी चढविला होता. उन्ह उतरणी, आतून बंद बेट, थांग अथांग, तळे संध्याकाळचे, तीन ओळीची कविता, सरवा हे कवितासंग्रह, राक्षसाचे वाडे हे बालकुमार साहित्य, कथाकार वामनराव चोरघडे समीक्षाग्रंथ, प्रेमचंद निवडक कथा (अनुवाद), कोलंबसाची इंडिया व पायावर चक्र (प्रवास वर्णन), ऊस यात्रा की खोज मे (हिंदी अनुवाद), थेंब थेंब चिंतन (चिंतन), इत्यादी साहित्य संपदा प्रकाशित झाली आहे. ‘उन्ह उतरणी’ला राज्य शासनाचा कविवर्य केशवसुत पुरस्कार, ‘तळे संध्याकाळचे’ला विदर्भ साहित्य संघाचा वसंतराव वऱ्हाडपांडे स्मृती पुरस्कार, नाशिकच्या युगांतर प्रतिष्ठानतर्फे बंधुमाधव पुरस्कार, ‘थांग अथांग’ला कविवर्य कुसुमाग्रज पुरस्कार, कवी उ.रा. गिरी पुरस्कार, कोलंबसाची इंडिया या प्रवासवर्णनाला वि.सा. संघाचा गाडगेबाबा स्मृती पुरस्कार, सवरेत्कृष्ट वाङ्मयासाठी बापूसाहेब ठाकरे अकादमी पुरस्कार, आकांक्षा प्रकाशनने प्रकाशित केलेल्या सरवा या कवितासंग्रहाला इचलकरंजीच्या आपटे वाचन मंदिरातर्फे विशेष लक्षणीय पुरस्कार इत्यादी पुरस्काराने त्यांना सन्मानित करण्यात आले होते. आकांक्षा प्रकाशनतर्फे ‘जातो माघारा’ हा त्यांचा शेवटचा काव्यसंग्रह प्रकाशनाच्या वाटेवर असतानाच त्यांचे निधन झाले.

Sham Kurle
बालसाहित्य शाम कुरळे बेपत्ता; कोल्हापुरात दिसल्याचे काहींचे दावे
shrikant shinde s work report marathi news
श्रीकांत शिंदे यांच्या कार्यअहवालावर राज ठाकरे यांची छबी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते रविवारी डोंबिवलीत प्रकाशन
Senior educationist writer Meena Chandavarkar passed away
ज्येष्ठ शिक्षणतज्ज्ञ, लेखिका मीना चंदावरकर यांचे निधन
Babasaheb Ambedkar published Mooknayak lyrics by Vamandada Kardak in the voice of Hariharan
एका वर्तमानपत्राचे गाणे होताना…! ‘मूकनायक’ या वामनदादा कर्डकांचे गीत हरिहरन यांच्या आवाजात; आज प्रसारण