वसई-विरारमध्ये सलग दुसऱ्या दिवशीसुद्धा वोडाफोन आयडिया (व्ही-आय) मोबाइल कंपनीच्या मोबाइल नेटवर्क नसल्याने ग्राहेक संपर्का बाहेर होते.  यामुळे ग्राहकांमध्ये प्रचंड संताप निर्माण होत आहे. कंपनीने गुरुवारी रात्रीपर्यंत नेटवर्क सुविधा पूर्ववत होईल असे सांगितले होते. पण २४ तास उलटूनही अजूनही नेटवर्क सेवा पूर्ववत झाली नसल्याने ग्राहकांची अनेक कामे रखडली आहेत.

बुधवारी रात्रीपासून पडणाऱ्या पावसामुळे गुरुवार सकाळपासून वसई-विरारमध्ये वोडाफोन आयडिया मोबाइल ग्राहकांचे नेटवर्क गुल झाले होते. मोबाइल फोन बंद झाल्याने नागरिकांना अनेक अडचणींचा सामना करावा लागला. त्यात गुरुवारी विविध सेवा केंद्रांवर ग्राहकांनी आपला रोष व्यक्त केला. गुरुवारी संध्याकाळपर्यंत सेवा पूर्ववत होईल असे कंपनीकडून सांगण्यात आले होते. पण शुक्रवारीसुद्धा ग्राहकांना याचा सामना करावा लागला. कारण या कंपन्यांचे अजूनही फोन लागत नसल्याच्या तक्रारी ग्राहक करत आहेत.

वोडाफोन आयडिया यांनी एकत्र येऊन व्ही आय या नव्या कंपनीत रूपांतरण केले आहे. यात गुरुवारी सकाळपासूनच या कंपनीच्या मोबाइलचे नेटवर्क गुल झाल्याने हजारो ग्राहकांचे फोन बंद पडले. मोबाइल काम करत नसल्याने अनेकांची महत्त्वाची कामे रखडली. कंपनी सेवा केंद्रात विचारणा केली असता व्ही आय सेवा केंद्राने माहिती दिली की, पावसामुळे त्यांच्या यंत्रणेत बिघाड झाल्याने सर्व यंत्रणा कोलमडली.

संध्याकाळी ४ वाजेपर्यंत सेवा सुरळीत होईल असे आश्वासन देण्यात आले. मात्र रात्र झाली तरी मोबाइलला नेटवर्क आले नसल्याने ग्राहकांचा प्रचंड मनस्ताप झाला. याचा फटका ऑनलाइन काम करणाऱ्या कामाचाऱ्यांना मोठय़ा प्रमाणात बसला आहे. त्याचबरोबर अनेक शाळांच्या ऑनलाइन परीक्षा सुरू असल्याने त्यांना आजही परीक्षा देता आली नाही.