साक्षीदार आणि नातेवाईकांवर दबाव टाकण्याचा प्रयत्न
सामाजिक बहिष्कारप्रकरणी रायगड जिल्ह्य़ात ४५ गुन्हे दाखल झाले असले तरी गुन्हे दाखल झाल्यानंतरही पीडित कुटुंबांचा जाच कमी झालेला नाही. उलट गाव कमिटय़ा आणि त्यांच्या सहकाऱ्यांकडून वाळीत कुटुंबांच्या नातेवाईक आणि मदतनिसांवर दबाव आणण्याचे प्रयत्न सुरू झाले आहेत.
थेरोंडा येथील संतोष कोंडे, धनंजय कोंडे आणि अंगद पाटील या तीन कुटुंबांना गावकीने वाळीत टाकले आहे. यांसदर्भात गाव कमिटीच्या पंचाविरोधात २०१३ मध्ये रेवदंडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला असून गावकीतील पंच सध्या जामिनावर आहेत. कोजागरी पोर्णिमेला यातील वाळीत असलेल्या अंगद पाटील यांच्या कुटुंबीयांना मारहाण करण्यात आली. बहीण प्रतीक्षा व तिचे पती कैलास टिवळेकर यांना बेदम मारहाण करण्यात आली. याबाबत त्यांनी रेवदंडा पोलीस ठाण्यात तक्रार नोंदवण्याचा प्रयत्न केला. मात्र पोलिसांनी त्यांची स्वतंत्र तक्रार नोंदवून घेतली नाही, असा आरोप संतोष कोंडे, धनंजय कोंडे आणि अंगद पाटील यांनी आज पत्रकार परिषदेत केला. वाळीत प्रकरणात हे दोघे साक्षीदार असल्याने त्यांना ही मारहाण झाली असावी, असा संशय त्यांनी या वेळी व्यक्त केला. दुसरीकडे एकदरा येथील वाळीत प्रकरणात पीडित कुटुंबांना मदत करणाऱ्या साक्षीदारांवर पोलिसांनी खोटे गुन्हे दाखल करून घेतले असल्याचा आरोप आज एकदरा येथील ग्रामस्थांनी केला.
एकदरा येथील वाळीत असलेल्या जगन्नाथ वाघरे याला गेल्या ३१ डिसेंबरला मारहाण झाली होती. याप्रकरणी पोलिसांनी सुरुवातीला वाघरे यांची तक्रार नोंदवण्यास नकार दिला. पोलीस अधीक्षकांकडे याबाबतची तक्रार केल्यानंतर २ जानेवारीला गुन्हा दाखल करण्यात आला. ३ जानेवारीला जगन्नाथ वाघरे आणि त्यांच्या सहकाऱ्यांवर विनयभंग आणि मारहाण केल्याचा गुन्हा मुरुड पोलीस ठाण्यात दाखल करून घेतला. आता नऊ महिन्यांनंतर मारहाण झालेल्या वाघरे आणि वाळीत प्रकरणात त्याचा बाजूने उभ्या राहणाऱ्यांवर दोषारोप पत्र दाखल करण्याचा घाट पोलिसांनी घातला असल्याचा आरोप या गावकऱ्यांनी केला. विशेष म्हणजे तक्रार देणाऱ्या मुलीच्या आईवडिलांनीच समोर येऊन वाघरे आणि त्याच्या सहकाऱ्यावर खोटे गुन्हे नोंदवले असल्याचे जाहीर केले. सासरच्या दबावामुळे मुलीने हे कृत्य केल्याचे त्यांनी सांगितले. रायगड जिल्ह्य़ात सामाजिक बहिष्कारप्रकरणी ४५ गुन्हे दाखल करण्यात आले आहे. यात ७४२ आरोपी निष्पन्न झाले आहेत. यातील ६४८ आरोपींना वाळीत प्रकरणात अटक करण्यात आली, तर ३० जणांना अटकपूर्व जामीन मिळाला आहे. ६४ आरोपींना अद्याप अटक झालेली नाही. सामाजिक बहिष्काराच्या या प्रकरणांना प्रसारमाध्यमांनी वाचा फोडल्यानंतर गुन्हे दाखल झाले असले, तरी जामिनांवर सुटलेल्या पंच कमिटय़ांकडून पीडित कुटुंबावर जाच सुरूच असल्याचे या दोन प्रकरणांमुळे समोर आले आहे.
दोन्ही प्रकरणांचा वरिष्ठ अधिकाऱ्यांकडून तपास करण्याच्या निर्देश दिले आहेत. थेरोंडय़ा प्रकरणात पीडितांना मारहाण झाल्याचे निष्पन्न झाले, तर आरोपींचे जामीन रद्द करण्यासाठी न्यायालयात अर्ज केला जाईल. – राजा पवार, अप्पर पोलीस अधीक्षक

वाळीतप्रकरणी गुन्हा दाखल होऊन आज दोन वर्षे झाली, पण गावपंचाकडून आमच्या कुटुंबावर जाच सुरूच आहे. आमच्याच घरात भीतीच्या सावटाखाली राहण्याची वेळ आली, वारंवार तक्रारी करूनही पोलीस सहकार्य करत नाही. – अंगद पाटील, पीडित

माझ्या मुलीने सासरच्या दबावामुळे जगन्नाथ वाघरे आणि त्याच्या सहकाऱ्यांवर खोटा गुन्हा दाखल केला. तिचा विनयभंग झाला नाही अथवा तिला मारहाण करण्यात आली नाही.
– रामजी डामशेट, तक्रारदार मुलीचे वडील

महिलांना पुढे करून खोटे गुन्हे दाखल करण्याचा प्रयत्न पंच कमिटी करत आहे. यापूर्वी २०११ अशीच विनयभंगाची
तक्रार नोंदवण्यात आली होती. साक्षीदारांवर दबाव टाकण्यासाठी हे गुन्हे दाखल केले जात आहेत.
– जगन्नाथ वाघरे, पीडित