गोंदिया : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात पीडिता रावणवाडी येथील वंदना मोह सिडाम यांच्या मुलीचा होरपळून मृत्यू झाला. वंदना सिडाम यांची प्रसूती ३ जानेवारीला पहेला येथील प्राथमिक आरोग्य केंद्रात झाली होती, मात्र मुलीचे वजन कमी असल्याने बाळाला जिल्हा रुग्णालयात हलविण्याचा सल्ला डाक्टरांनी दिला होता, मात्र महिलेचा पती हा पुणे येथे नोकरीला असल्याने सासू सासऱ्यांनी बाळाला भंडारा सामान्य रुग्णालयात दाखल केले होते. बाळ अतिशय नाजूक असल्याने त्याला अतिदक्षता विभागात ठेवण्यात आले होते. रात्रीच्या सुमारास जेव्हा रुग्णालयात आग लागली तेव्हा बाळाच्या आईला याची माहिती सुद्धा देण्यात आली नव्हती. पण वंदना यांनी माझं बाळ कुठे आहे याची विचारणा केली असता उडवाउडवीची उत्तरे देण्यात आली होती. अखेर दिवस उजळताच तुमच्या बाळाचा मृत्यू झाला असल्याच्या दु:खद धक्काच रुग्णालय प्रशासनाने दिला, त्यामुळे वंदना पूर्णत: खचली होती. हा धक्का इतका मोठा होता की वंदना सिडाम यांची प्रकृती खालावली. त्यांना प्राथमिक आरोग्य केंद्र पहेला येथे दाखल करण्यात आले आहे. ३ जानेवारीपासून आम्ही दोघे दररोज  नातीला पहायला रुग्णालयात ये-जा करीत होतो. कमी वजनाचं आमची नात अखेर काही दिवसांनी उपचारानंतर सुखरूप घरी येणार या आशेने होतो. रुग्णालयात आजारी लोकांचे जीव वाचवतात, असे गृहीत होते पण येथे तर रुग्णालय प्रशासनाच्या निष्काजळीपणाचे फटके रुग्णांच्या नातेवाईकांना आपल्या बाळाचे जीव गमावून सोसावे लागते, असे आयुष्यात पहिल्यांदाच दिसून आल्याचे उत्तर कमला सिडाम यांनी दिले. माझे पती कामानिमित्त पुणे येथे राहतात, मी त्यांना फोनवर मुलगी झाल्याची बातमी दिली. त्यानंतर दररोज ते बाळाची विचारपूस करीत होते. पण आता त्यांना बाळ कुठून दाखवणार, अशी प्रतिक्रिया वंदना सिडाम यांनी दिली. रविवारी मंडळ अधिकारी कैलाश वैद्य यांनी मृत मुलीच्या परिवाराला शासनाकडून पाच लाखांच्या मदतीचे धनादेश सोपवले. पण या धनादेशानेही वंदनाच्या चेहऱ्यावर सुख देऊ शकले नाही.