पीडित योगिताचा मन:स्ताप

गोंदिया : भंडारा जिल्हा सामान्य रुग्णालयात अतिदक्षता विभागात उपचार घेणाऱ्या १० बालकांचा करुण अंत झाला. त्यात भंडारा जिल्ह्य़ातील श्रीनगर येथील योगिता विकेश दुळसे यांनी आम्ही आपल्या कुटुंबाचा वारस गमावल्याची प्रतिक्रिया व्यक्त केली.

योगिता यांची प्रसूती पहेला प्राथमिक आरोग्य केंद्रात ७ जानेवारीला झाली होती, बाळाचे वजन कमी असल्याने डॉक्टरांनी बाळाला आईसीयूमध्ये ठेवायला सांगितले होते, आधीच गरीब परिस्थिती असल्याने दुळसे कुटुंबीयांनी बाळाला खासगी रुग्णालयात न नेता शासकीय रुग्णालयात दाखल केले होते. ८ तारखेला रात्री मन सुन्न करणारी घटना घडली. आता राजकीय मंडळी येऊन जात आहेत व पीडित परिवारांचे सांत्वन करीत आहेत, पण या मातेची ओंजळ रिकामी झाली असल्याने त्याला भरून कोणी काढणार काय? अशा प्रश्न या मातेच्या डोळ्यातून निघणारे अश्रू विचारत आहेत.

अगदी तीनच दिवसांचे आमचे बाळ कुटुंबात आल्याने त्याच्या वजनाचे सोडले तर प्रत्येक जण तीन दिवसांपासून कुटुंबात वारस आल्याची चर्चा करत होते. थोरल्या भावाकडे एक मुलगी असल्यामुळे आता लहान भावाकडे मुलगा झाल्याचा आनंद होता. पण प्रशासनाच्या निष्काळजीपणाचे ओझे दुळसे कुटुंबीयांना सोसावे लागत असल्याचे त्यांचे म्हणणे आहे. शासनाने मदत दिली खरी पण त्याऐवजी आमच्या बाळाचा जीव कित्येक पटीने महत्त्वाचा होता. राजकारण्यांनी घरी घिरटय़ा घालून वारंवार दु:खात भर घालणाऱ्या वेदना विकेश दुळसे यांनी व्यक्त केल्या.