विजयी सभेत डॉ. सुजय विखे यांचा इशारा

निवडणुकीच्या अखेरच्या टप्प्यात काही जणांनी प्रचार न करण्याचे आदेश दिले होते, मात्र मी काही राधाकृष्ण विखे नाही, काम न करणाऱ्यांचा येत्या तीन महिन्यांत हिशेब चुकता करू, माझ्यावर वेळ आली होती म्हणून मी शांत होतो, आता ‘सबका टाइम आयेगा’ असा स्पष्ट इशाराच भाजपचे नवनिर्वाचित खासदार डॉ. सुजय विखे यांनी आपल्या पहिल्याच सभेत दिला आहे.

मतमोजणीनंतर आयोजित केलेल्या विजयी सभेत ते बोलत होते. या वेळी पालकमंत्री प्रा. राम शिंदे, विधानसभेचे उपसभापती विजय औटी, माजी विरोधी पक्षनेते आ. राधाकृष्ण विखे, जिल्हा परिषद अध्यक्ष शालिनीताई विखे, भाजपचे जिल्हाध्यक्ष भानुदास बेरड, माजी आमदार अनिल राठोड, शिवसेनेचे जिल्हाप्रमुख शशिकांत गाडे आदी उपस्थित होते.

डॉ. विखे म्हणाले, नगर शहरात दादागिरी करणाऱ्यांना मला आधी तोंड द्यावे लागणार आहे, दादागिरी करणाऱ्यांना आधी माझा सामना करावा लागेल, जेथे दादागिरी होईल, तेथे मी उभा राहील, माझ्या आजोबांना, स्व. बाळासाहेब विखे यांना ज्यांनी त्रास दिला, त्या सर्वाना स्व. बाळासाहेब यांच्या नातवाने चोख उत्तर दिले आहे. माझ्यावर वेळ आली होती म्हणून मी शांत होतो. परंतु आता ‘सबका टाइम आयेगा’. ज्या लोकांनी ‘डुप्लिकेट’पणा केला, त्यांचे रेकॉर्ड माझ्याकडे आहे.

निळवंडेचे पाणी मिळवून देणे, नगरचा औद्योगिक विकास व नगर तालुक्याचा पाणी प्रश्न सोडवणे ही तीन कामे आपण करणार आहोत, असे आश्वासन देऊन विखे म्हणाले, की नरेंद्र मोदी पुढील पंचवीस वर्षे पंतप्रधान राहतील, माझे पालकत्व मुख्यमंत्र्यांनी स्वीकारले असले, तरी मी युतीमधील ज्येष्ठ नेत्यांच्या शब्दाबाहेर जाणार नाही. खासदार झालो म्हणून माझ्यात बदल होणार नाही, मी आज आहे तसाच साधा राहीन.