देशात नरेंद्र मोदी यांच्या नेतृत्वाखाली एनडीएचे सरकार येणार व त्याच वेळी नगर लोकसभा मतदारसंघामध्ये दिलीप गांधी यांनी विजयाची हॅटट्रिक साधताच नगर दक्षिणमध्ये ज्या तीन तालुक्यांमध्ये दिलीप गांधी यांना मोठी आघाडी मिळाली अशा श्रीगोंदे, कर्जत व जामखेड तालुक्यात महायुतीच्या कार्यकर्त्यांनी रस्त्यावर उतरून प्रचंड जल्लोष केला. ढोलताशाचा गजरात, फटाक्यांची आतषबाजी करत, पेढे वाटून आनंद साजरा केला. त्याच वेळी काँग्रेस व राष्ट्रवादी काँग्रेसचे कार्यकर्ते मात्र गायब झाले होते.
लोकसभा निवडणुकीच्या निकालासाठी सकाळपासूनच नागरिक टीव्हीसमोर बसले होते. तालुक्यातील काही भागांमध्ये वीजकपात असल्याने वीज नव्हती, त्यांचा मात्र हिरमोड झाला होता. पहिल्या फेरीपासून देशात एनडीएने आघाडी घेतल्याने महायुतीच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष सुरू केला. गांधी प्रथमपासून आघाडीवर होते हे पाहून भाजप, शिवसेना व आरपीआयचे कार्यकर्ते येथील छत्रपती चौकात जमले. त्यांनी फटाक्यांची आतषबाजी केली, तोफा उडवल्या, पेढे वाटले व गुलालाची उधळण करीत ढोलताशाच्या गजरात आनंद साजरा केला. शिवसेनेचे तालुकाप्रमुख बळीराम यादव, भाजपचे तालुकाध्यक्ष अशोक खेडकर, आरपीआयचे तालुकाध्यक्ष संजय भैलुमे, युवासेनेचे दीपक शहाणे, उमेश जेवरे, सुखदेव शेळके, भाजपचे शहराध्यक्ष विनोद दळवी, महावीर बोरा आदींचा त्यात सहभाग होता. श्रीगोंदे तालुक्यात महायुतीचे राजेंद्र म्हस्के, दत्ता हिरणवाळे, बळीराम डोळसे, बाळासाहेब महाडिक, नंदकुमार ताडे, बाळासाहेब काटे हे शनि चौकात जमले व फटाके फोडून घोषणा देत त्यांनी जल्लोष केला. तालुक्यातील मिरजगाव, राशिन, मिगाव गांगर्डा येथेही पक्षाच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष केला.
 निकालाबाबत प्रतिक्रिया देताना आमदार बबनराव पाचपुते यांनी पक्षाचे उमेदवार राजळे यांच्याविषयीच नाराजी व्यक्त केली. ते म्हणाले, आम्ही प्रामाणिकपणे काम केले, मात्र उमेदवाराविषयी तालुक्यात मोठी नाराजी होती. शिवाय नरेंद्र मोदी यांची लाट होती, यामुळे येथे भाजपला यश मिळाले आहे.