अवकाळीमुळे कापूस, सोयाबीन, संत्र्यांचे मोठे नुकसान; अहवालानुसार मदतीसाठी दीड हजार कोटींची गरज

परतीच्या व अवकाळी पावसामुळे पश्चिम विदर्भात ७२ टक्के क्षेत्रातील सुमारे २२ लाख ४४ हजार हेक्टरमधील पिकांचे नुकसान झाल्याचा अहवाल विभागीय आयुक्तालयातर्फे महसूल विभागाकडे पाठवण्यात आला आहे. विभागाला नुकसानभरपाईपोटी १ हजार ५४३ कोटी रुपयांचा निधी लागणार आहे. आता शेतकऱ्यांचे डोळे नुकसानभरपाईकडे लागले आहेत.

एनडीआरएफ, एसडीआरएफच्या निकषांनुसार शेतकऱ्यांना नुकसानभरपाई देण्यासंदर्भात नुकसानीचा अंतिम अहवाल तयार करण्यात आला. तो महसूल विभागाच्या उपसचिवांकडे पाठवण्यात आला आहे.

पश्चिम विदर्भात ऑक्टोबरच्या दुसऱ्या पंधरवडय़ात झालेल्या परतीच्या पावसाने शेती, फळबागांचे मोठय़ा प्रमाणावर नुकसान झाले. कापूस, सोयाबीन आणि संत्री बागांना या पावसाचा मोठा फटका बसला. दिवाळीनंतर नुकसानीचे पंचनामे पूर्ण करण्याच्या प्रक्रियेला वेग आला. अंतिम अहवालानुसार अमरावती विभागातील एकूण २० लाख २५ हजार १९७ शेतकऱ्यांना या अतिवृष्टीने संकटात टाकले आहे.

अमरावती विभागात यंदाच्या खरीप हंगामात सुमारे ३१ लाख ४ हजार हेक्टरमध्ये पेरा झाला होता. त्यापैकी २२ लाख ४४ हजार ३९८ हेक्टरमधील पिकांचे म्हणजे लागवडीखालील क्षेत्रापैकी ७२ टक्के क्षेत्रातील पिकांची हानी झाली आहे.

अतिवृष्टी, अवकाळी पावसामुळे झालेल्या नुकसानभरपाईसाठी एनडीआरएफ आणि एसडीआरएफचे निकष आहेत. यापूर्वी शासनामार्फत कोरडवाहू पिकासाठी प्रतिहेक्टर ६८०० रुपये, बागायती क्षेत्रासाठी १३५०० आणि फळबागांसाठी १८ हजार रुपये नुकसानभरपाई दिली जात होती. मात्र ही मदत अपुरी असल्याचे शेतकऱ्यांचे म्हणणे आहे. आता राज्यात सरकार स्थापन झालेले नाही. त्यामुळे सर्व निर्णय प्रशासकीय पातळीवरच घेतले जाणार आहेत. त्यामुळे नुकसानभरपाई कशी आणि कधी मिळणार हे प्रश्न कायम आहेत.

प्रारंभी पश्चिम विदर्भातील ५६ तालुक्यांमध्ये सुमारे १२ लाख हेक्टरमध्ये नुकसान झाल्याचा प्राथमिक अंदाज होता. मात्र, संपूर्ण पंचनामे केल्यानंतर नुकसानीचा आकडा वाढला आहे. नुकसानभरपाई संदर्भातील शासनाचे नियम, अध्यादेश, एसडीआरएफ, एनडीआरएफचे निकष व मार्गदर्शक सूचनांनुसार हेक्टरी मदत देण्यात येईल, अशी माहिती प्रशासकीय सूत्रांनी दिली. मात्र, यासाठी किती कालावधी लागेल, हे सांगण्यास त्यांनी असमर्थता दर्शवली.

अमरावती विभागात सोयाबीन लागवडीखाली सर्वाधिक १३ लाख २९ हजार हेक्टर क्षेत्र आहे. त्याखालोखाल कपाशीचे ११ लाख २६ हजार, तूर ४ लाख २७ हजार आणि खरीप ज्वारीचे ४९ हजार ५८० हेक्टर क्षेत्र आहे. अतिपावसामुळे विभागातील १२ लाख २६ हजार हेक्टरमधील सोयाबीन पिकाचे ३३ टक्क्यांच्या वर नुकसान झाल्याचे अंतिम अहवालात म्हटले आहे. कपाशीचे ८ लाख २१ हजार हेक्टर, ज्वारी पिकाचे ४२ हजार हेक्टरमध्ये नुकसान  झाल्याचेही नमूद आहे. याशिवाय विभागात २७ हजार शेतकऱ्यांचे १२ हजार हेक्टरमधील बागायती पिकांचे, तसेच ८ हजार ४१९ हेक्टरमधील फळबागांचे नुकसान झाले आहे, त्यात सर्वाधिक फटका हा संत्री, मोसंबी आणि डाळिंबाच्या बागांना बसला आहे. नुकसानभरपाईपोटी १ हजार ५१२ कोटी रुपयांचा निधी लागणार असून या निधीची मागणी महसूल विभागाकडे करण्यात आली आहे.