News Flash

विदर्भातील काँग्रेस नेत्यांमध्ये डॉक्टरेट मिळविण्याची लाट..

मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक राजकीय नेत्यांना इच्छा असतानाही उच्च शिक्षण घेता येत नाही, पण काही राजकीय नेते फावल्या वेळेचा सदुपयोग करून शैक्षणिक

| January 22, 2013 01:26 am

मंत्री किंवा लोकप्रतिनिधी म्हणून काम करताना अनेक राजकीय नेत्यांना इच्छा असतानाही उच्च शिक्षण घेता येत नाही, पण काही राजकीय नेते फावल्या वेळेचा सदुपयोग करून शैक्षणिक विकास करून घेतात. राजकारणात उच्च विद्याविभूषित असणे म्हणजे पक्षात आणि समाजात वेगळा सन्मान मिळतो, हे लक्षात घेऊनच अखिल भारतीय काँग्रेस समितीचे सचिव आणि माजी मंत्री अनिस अहमद आणि माजी मंत्री सतीश चतुर्वेदी यांनी मिळालेल्या वेळेचा सदुपयोग करून पीएच. डी. मिळविली. राष्ट्रसंत तुकडोजी महाराज नागपूर विद्यापीठाने या दोन्ही नेत्यांना नुकतीच पीएच. डी. प्रदान केली.
काँग्रेसचे नेते आणि रोजगार हमी योजना मंत्री डॉ. नितीन राऊत यांना तीन वर्षांपूर्वी नागपूर विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली. आता त्यांच्या पावलावर पाऊल ठेवत माजी मंत्री सतीश चतुर्वेदी आणि त्यानंतर राऊत यांचे पक्षातील विरोधक अनिस अहमद यांनीही आचार्य पदवी घेऊन उच्चविद्याविभूषित म्हणून स्वतला सिद्ध केले.
सतीश चतुर्वेदी आणि अनिस अहमद यांच्या नागपुरात शिक्षण संस्था आहेत. मोठे शैक्षणिक पाठबळ असल्यामुळे त्यांनी शोधनिबंध लिहून विद्यापीठाकडे सादर केले. गेल्या विधानसभा निवडणुकीमध्ये अनिस अहमद यांचा पश्चिम नागपुरातून आणि सतीश चतुर्वेदी यांचा पूर्व नागपुरातून पराभव झाला होता. चतुर्वेदी यांना हरविण्याचे भारतीय जनता पक्षासमोर मोठे आव्हान असताना कृष्णा खोपडे यांनी ते लीलया पेलले. अनिस अहमद यांना पक्षातील वरिष्ठांच्या कृपेमुळे अखिल भारतीय काँग्रेस समितीमध्ये स्थान मिळाले. नुकत्याच झालेल्या हिमाचल प्रदेशच्या निवडणुकीची जबाबदारी त्यांच्यावर देण्यात आली आणि त्यात ते यशस्वी झाले त्यामुळे त्यांचे राजकीय वजन वाढले. चतुर्वेदींना त्यांच्या पक्षातील काही नेत्यांमुळे राजकारणात स्थैर्य मिळाले नाही. त्यामुळे मध्यतरीच्या काळात ते राजकारण आणि समाजकारणापासून दूर होऊन अभ्यासात आणि संशोधनात मग्न झाले असावेत. चतुर्वेदी यांनी विदर्भातील स्वातंत्र्य सैनिकांच्या इतिहासावर संशोधन करून शोधनिबंध नागपूर विद्यापीठाकडे सादर केला. त्यांना विद्यापीठाने पीएच. डी. प्रदान केली.
अनिस अहमद यांना राजकारणामुळे शैक्षणिक विकास करता आला नाही. पक्षाने टाकलेली हिमाचल प्रदेशची जबाबदारी पार पाडल्यावर त्यांनी संशोधनासाठी जास्तीत जास्त वेळ देणे पसंत केले. ‘भारतातील मुस्लिम समाजाचे निशुल्क शिक्षण व त्यांच्यासाठीच्या योजना’ या विषयावर त्यांनी नागपूर विद्यापीठात शोधनिबंध सादर केला आणि विद्यापीठाने त्यांना नुकतीच पीएच.डी. प्रदान केली. काँग्रेसचे हे तीनही मातब्बर नेते निवडणुकीच्या वेळी एकमेकावर कुरघोडी करीत असले तरी आता तिघांच्या नावासमोर डॉक्टर ही उपाधी लागली आहे. आगामी विधानसभेच्या निवडणुकीमध्ये हे तीनही ‘डॉक्टर’जनतेला कसे आत्मसात करून राजकारणातील पीएच.डी. मिळवितात हे बघावे लागेल.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on January 22, 2013 1:26 am

Web Title: vidarbha congress leader preparing for doctor degree
टॅग : Congress
Next Stories
1 दुष्काळी भागातील कामांसाठी २२०० कोटींचा प्रस्ताव – मुख्यमंत्री
2 दुष्काळामुळे जलसिंचन योजनांना गती द्यावी – शरद पवार
3 महिलांनी अन्यायाविरोधात आक्रमक व्हावे
Just Now!
X