अतिवृष्टीने झालेल्या हानीसाठी लावण्यात आलेले मदतीचे विद्यमान निकष पुरेसे नसल्याने वेगळे निकष लावून वाढीव मदत द्यावी लागेल, असे मत कें द्रीय कृषिमंत्री शरद पवार यांनी शनिवारी व्यक्त केल्याने शेतकऱ्यांच्या आशा पल्लवित झाल्या आहेत.
पूरग्रस्त भागाची पाहणी करण्याची आलेल्या कृषिमंत्री शरद पवार यांनी विदर्भ दौऱ्याची सुरुवात वर्धा जिल्ह्य़ापासून केली. वर्धा-नागपूर रस्त्यावरील कोलगाव व खापरी या अतिवृष्टीने ग्रस्त गावांना भेटी दिल्यानंतर स्थानिक विश्रामगृहावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधला.
आपण पूरग्रस्त भागाच्या केलेल्या पाहणीतून विदारक चित्र पुढे आल्याचे प्रारंभीच नमूद करून ते म्हणाले, ‘नुकसान अपरिमित आहे. शेतकऱ्यांना अतिवृष्टीचा मोठा फ टका बसल्याचे दिसून आले. नुकसान भरपाई म्हणून राज्य शासनाने मदत जाहीर केली. पण, ती पुरेशी नाही, असे दिसून येते. म्हणून वेगळे निकष लावून मदत द्यावी लागेल. केंद्रीय आढावा समितीचा प्रमुख म्हणून आपण याचा वेगळा विचार करू. केंद्रीय पथकाचा दौरा झाला असून त्यांच्या अहवालावर निर्णय घेतांना अधिकाधिक मदत विदर्भातील शेतकऱ्यांना देण्याचा विचार होईल. अतिवृष्टीने देशात जे नुकसान झाले त्यापैकी ७० टक्के नुकसान महाराष्ट्रात व प्रामुख्याने विदर्भात झाल्याचे माझे मत आहे,’
राज्य शासनाकडूनही वाढीव मदतीचा प्रस्ताव आला असून, त्यावर सकारात्मक विचार केला जाईल, असे पवार यांनी सांगितले. विदर्भातील कापूस चांगल्या प्रतीचा आहे. त्याची अधिकाधिक निर्यात करून शेतकऱ्यांना चांगला मोबदला मिळवून देण्याचा प्रयत्न केला जाईल. हमीभावात स्वतंत्रपणे वाढ केली जात नाही. ठरलेल्या हमीभावानेच देशभरात खरेदी केली जाते, असे पवार यांनी एका प्रश्नाच्या उत्तरात स्पष्ट केले. यावेळी राजकीय बाबींवर उत्तर देणार नसल्याचे स्पष्ट करून पवार यांनी पत्रकार परिषदेस विराम दिला.
वर्धा-नागपूर मार्गावरील सेलू तालुक्यातल्या कोलगाव व खापरी या गावातील शेतीची पवार यांनी पाहणी केली. अतिवृष्टीने खचलेल्या पुलाची पाहणी करतांना पावसाचा जोर मोठा असल्याची टिपण्णी त्यांनी केली.
खरडून व वाहून गेलेल्या शेतीचे निरीक्षण करतांना त्यांनी जुन्या तलावातील माती आणून या शेतीत भराव टाकण्याची सूचनाही केली. पवारांच्या या दौऱ्यात पालकमंत्री राजेंद्र मुळक, मंत्री अनिल देशमुख, रणजित कांबळे व आमदार प्रा.सुरेश देशमुख सहभागी झाले होते. विश्रामगृहावर खासदार दत्ता मेघे, चारूलता टोकस, राजू तिमांडे, अमर काळे व अन्य मान्यवरांनी त्यांचे स्वागत केले.