नागपूर-मुंबई समृद्धी महामार्ग हा विदर्भाच्या उन्नतीचे प्रवेशद्वार असून  माजी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कर्तृत्वाचे फलित असलेल्या समृद्धी महामार्गाचे ‘विदर्भ-मराठवाडा समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करावे, अशी मागणी माजी कृषिमंत्री डॉ. अनिल बोंडे यांनी केली आहे.

आजपर्यंत मुंबई ही राजधानी व मुख्य बंदरापासून विदर्भ दूर राहिला आणि त्यामुळेच विदर्भातील शेतमाल असो किंवा कारखान्यातील तयार माल असो, त्यांना मुंबईची बाजारपेठ मिळू शकली नाही. विदर्भाचा विकास साधायचा असेल तर मुंबईसारखी बाजारपेठ व निर्यातीकरिता बंदर पाहिजे या मुख्य उद्देशाने फडणवीस यांनी समृद्धी महामार्गाचे नियोजन केले. दुर्दैवाने शिवसेनेने नेहमीप्रमाणे याही प्रकल्पाला सुरुवातीपासून विरोध केला.

विधानसभेमध्ये पश्चिम महाराष्ट्रातील काँग्रेस व राष्ट्रवादीच्या सर्व नेत्यांची भूमिका या समृद्धी महामार्गाच्या विरोधातच होती. कोल्हापूर ते मुंबई महामार्ग ६ तासात जाणारा पाहिजे, परंतु विदर्भाला जोडणाऱ्या महामार्गाला विरोध का? हा सवाल आपण विधानसभेत विचारला होता. समृद्धी महामार्गामुळे नागपूर मुंबईला आठ तासात जोडले जाईल. नागपूर अमरावतीची संत्री, फुले, फळे, भाज्यांना मुंबईची बाजारपेठ प्राप्त होईल. अमरावतीच्या टेक्स्टाईल पार्कमधील कापड, तयार कपडे निर्यातीकरिता व विक्रीकरिता  कमी वेळात, कमी पैशांमध्ये मुंबईला पाठवणे शक्य होईल. आज रेल्वेवर अवलंबून राहणाऱ्या सर्व प्रवाशांना सुद्धा ८ ते  १० तासात मुंबई गाठता येईल, असेही बोंडे म्हणाले.

रोजगाराच्या संधी मोठय़ा प्रमाणात या समृद्धी मार्गामुळे वाढणार आहेत. या मार्गावर असणाऱ्या १०  नोड्स व्यापारी, प्रवाशांना थांबा, जवळपासच्या प्रदेशामधून निघालेल्या मालाची साठवणूक, विक्री, सेवाक्षेत्र, हॉटेल, लॉजीस्टिक इत्यादीच्या सुविधामुळे हजारो तरुणांना रोजगार प्राप्त होईल.

हा महामार्ग औरंगाबाद, नाशिक वरून जात असल्याने मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र जोडले जाणार आहे. तेथील बाजारपेठ विदर्भाला प्राप्त होणार आहे. तसेच मराठवाडा व उत्तर महाराष्ट्र सुद्धा रोजगार व व्यापाराकरिता समृद्ध होणार आहे. त्यामुळेच  फडणवीस यांच्या कर्तृत्वाचे फलीत असलेल्या या समृद्धी महामार्गाचे ‘विदर्भ-मराठवाडा समृद्धी महामार्ग’ असे नामकरण करावे व तातडीने महामार्गाचे काम पूर्ण करावे ही संपूर्ण विदर्भ-मराठवाडावासीयांची भावना आहे, असे बोंडे यांनी म्हटले आहे.