येत्या गुरुवारी नागपुरात होणारी सोनिया गांधींची जाहीर सभा यशस्वी करण्यासाठी मुख्यमंत्री व प्रदेशाध्यक्ष जातीने लक्ष घालत असले तरी विदर्भातील मंत्री मात्र पैसा खर्च करण्याच्या बाबतीत हात आखडता घेत असल्याने सभेसाठी येणाऱ्या कार्यकर्त्यांची सोय कशी लावायची, असा प्रश्न काँग्रेसच्या स्थानिक नेत्यांना पडला आहे.
नागपुरात काँग्रेसच्या अध्यक्ष सोनिया गांधींच्या हस्ते २१ नोव्हेंबरला राजीव गांधी जीवनदायी आरोग्य योजनेचा शुभारंभ होणार आहे. राज्यातील २ कोटी गरिबांना लाभ देणाऱ्या या योजनेच्या माध्यमातून आगामी लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराचा बिगुल फुंकण्याचा कॉंग्रेसचा या सभेच्या माध्यमातून प्रयत्न आहे. या सभेला विक्रमी गर्दी जमावी म्हणून गेल्या आठवडय़ात मुख्यमंत्री पृथ्वीराज चव्हाण व प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांनी नागपुरात विदर्भातील सर्व प्रमुख नेत्यांची बैठक घेतली. यात काँग्रेसचे विदर्भातील पाचही मंत्री सहभागी झाले होते. चव्हाण व ठाकरे यांच्यासमोर गर्दी जमवण्यासाठी लागणारा सर्व खर्च उचलण्याची तयारी दाखवणाऱ्या या मंत्र्यांनी आता जिल्ह्य़ाच्या पातळीवरील नेत्यांना ठेंगा दाखवायला सुरुवात केल्याने काँग्रेसच्या वर्तुळात अस्वस्थता आहे.
या सभेसाठी प्रदेश काँग्रेसतर्फे राज्य परिवहन महामंडळाकडे ३६०० बसेसची मागणी नोंदवण्यात आली आहे. या बसेस प्रत्येक जिल्ह्य़ांना देण्यात येणार आहेत. या बसमधून नागपुरात येणाऱ्या कार्यकर्त्यांच्या दोन वेळच्या जेवणाची सोय विदर्भातील मंत्र्यांनी करावी, असे निर्देश देण्यात आलेले असतानाही मंत्र्यांनी आता हात वर केल्याने जिल्हास्तरावरचे स्थानिक नेते अस्वस्थ झाले आहेत. या सभेसाठी जास्तीत जास्त कार्यकर्ते आणण्याची जबाबदारी विदर्भातील पक्षाच्या आमदारांवरही टाकण्यात आली आहे. प्रत्येक आमदारांना किती बसेस द्यायच्या, याचेही नियोजन ठरवण्यात आले आहे. मंत्री मदत करतील, या आशेवर आमदारही आजवर होते. मात्र, त्यांच्याही पदरी आता निराशा पडली आहे. अनेक आमदारांनी प्रदेश काँग्रेसकडे मंत्री सहकार्य करत नाहीत, अशा तक्रारीही केल्या असल्याची माहिती पक्षाच्या एका ज्येष्ठ नेत्याने मंगळवारी ‘लोकसत्ता’शी बोलताना दिली. या सभेच्या माध्यमातून संपूर्ण विदर्भातील वातावरण काँग्रेसमय करण्याच्या प्रयत्नात असलेल्या पक्षाच्या नेत्यांना ठिकठिकाणी गटबाजीलाही तोंड द्यावे लागत आहे. या सभेच्या निमित्ताने विदर्भाचा दौरा करणारे प्रदेशाध्यक्ष माणिकराव ठाकरे यांच्यावर याच कारणासाठी चंद्रपूरचा दौरा रद्द करण्याची वेळ आली. लातूरच्या कार्यक्रमामुळे हा दौरा रद्द करावा लागला, असे स्पष्टीकरण ठाकरे यांच्यातर्फे आता देण्यात येत असले तरी वस्तुस्थिती मात्र वेगळी आहे, असे हा नेता म्हणाला.

नाराजीला तोंड फुटणार
मुख्यमंत्र्यांनी या सभेच्या आयोजनाशी संबंधित सर्व जबाबदारी विदर्भातील त्यांच्या विश्वासातील मंत्र्यांवर सोपवल्याने पक्षाच्या खासदारांच्या वर्तुळातही नाराजीची भावना आहे. गुरुवारची सभा झाल्यानंतर या नाराजीला तोंड फुटण्याची शक्यता आता पक्षाच्या वर्तुळात बोलून दाखवली जात आहे.