महाराष्ट्रातून संत्री कृषी निर्यात क्षेत्राच्या माध्यमातून पाच वर्षांमध्ये संत्र्यांची निर्यात १० हजार मेट्रिक टनाने वाढवण्याचे राज्य सरकारचे उद्दिष्ट अजूनही विविध कारणांमुळे पूर्ण होऊ शकलेले नाही. सरकारच्या प्रोत्साहनाअभावी संत्र्यांची निर्यात १० टक्क्यांवर स्थिरावल्याचे चित्र आहे. यंदा आतापर्यंत केवळ ३३.८६ मे. टन संत्र्याची निर्यात झाली असून २०१६-१७ मध्ये ७८८ मे.टन संत्र्याची निर्यात झाली  होती.

देशात संत्री उत्पादनामध्ये काही वर्षांपुर्वी अव्वल असणारा महाराष्ट्र आता मागे पडला असून राज्याची चौथ्या क्रमांकावर घसरण झाली आहे. कमी उत्पादकता हे त्याचे कारण मानले जात आहे. पंजाब सारख्या राज्याने ‘किन्नो’च्या उत्पादनात प्रति हेक्टरी २१.२ मे.टन एवढी झेप घेतली असताना महाराष्ट्र उत्पादकतेच्या बाबतीत शेवटच्या स्थानी आहे. राज्याची उत्पादकता केवळ ३.९ मे.टन प्रति हेक्टर आहे. राज्यात देशातील संत्री उत्पादनाच्या २० टक्के उत्पादन घेतले जाते. सध्या राज्यात १ लाख ०८ हजार हेक्टर क्षेत्रात संत्र्याच्या बागा आहेत. एकूण लागवडीपैकी सर्वाधिक क्षेत्र अमरावती आणि नागपूर या जिल्ह्यंमध्ये असल्याने या दोन जिल्ह्यत संत्री कृषी निर्यात क्षेत्राची स्थापना करण्यात आली. ही निर्यातवाढ सिंगापूर, हाँगकाँग, आखातातील देश, आणि बांग्लादेशात होईल, अशी शक्यता वर्तवण्यात येत होती. संत्री निर्यात क्षेत्राअंतर्गत कोटय़वधी रुपयांची गुंतवणूक होईल, असे स्वप्न रंगवण्यात आले, उत्पादन आणि उत्पादकता वाढवण्यासाठी त्याचा फायदा होईल, असे सांगितले गेले, पण अजूनही निर्यात सुविधांच्या बाबतीत संत्री उत्पादक शेतकऱ्यांचा व्यवस्थेशी संघर्ष सुरूच आहे. काही प्रयोगशील शेतकरी स्वत:हून निर्यातीसाठी प्रयत्न करीत आहेत. पंजाब, राजस्थान या राज्यांमध्ये निर्यातीसाठी ज्या पद्धतीने प्रोत्साहन दिले जाते, ज्या पद्धतीने विदर्भात ‘संत्रा इस्टेट’ची उभारणी केली जावी, अशी मागणी संत्रा उत्पादकांच्या संघटनांनी शासनाकडे केली, पण त्याकडे अजूनही लक्ष देण्यात आलेले नाही.

कृषी आयुक्तालयाच्या ताज्या अहवालानुसार यंदा राज्यातून ३३.८६ मे. टन संत्र्याची निर्यात झाली. त्याचे मूल्य २१ लाख रुपये आहे. २०१३-१४ मध्ये ५९ मे. टन संत्र्याची निर्यात झाली होती, ती २०१६-१७ पर्यंत वाढून ७८८ मे. टनापर्यंत पोहचल्याचे समाधान आहे. राष्ट्रीय लिंबूवर्गीय फळ संशोधन केंद्राच्या शास्त्रज्ञांच्या मते विदर्भात एकूण उत्पादनाच्या ३० टक्के संत्री निर्यातीची क्षमता आहे, पण हे प्रमाण सध्या १० टक्क्यांच्या खाली आहे. ‘नॅशनल ऑरेंज ग्रोअर्स असोसिएशन’ने देखील निर्यात वाढीसाठी प्रयत्न चालवले आहेत, पण यात मर्यादा आहेत. शेतकऱ्यांना निर्यात दर्जाच्या संत्र्याचे उत्पादन घेणे, संत्र्याची काढणी, प्रतवारी, पॅकिंग, उत्पादनोत्तर तंत्रज्ञान, निर्यात याबाबतीत योग्य प्रशिक्षण मिळणे आवश्यक आहे. ‘पायटोप्थोरा’ या रोगाचा प्रादुर्भाव आणि व्यवस्थापनाअभावी उत्पादकतेत घट ही सर्वात मोठी समस्या विदर्भात दिसून आली आहे.

संत्र्याला राजाश्रय मिळायला हवा- रवी पाटील

संत्र्याच्या निर्यातवाढीच्या मार्गात अनेक अडथळे होते. त्यामुळे मध्यंतरीच्या काळात निर्यात खुंटली होती. पण, आता बांग्लादेश, व्हिएतमान, कुवैत यासारख्या देशांमध्ये येथील सत्री चाललीआहेत, ही समाधानाची बाब आहे. पण, संत्र्याच्या निर्यातवाढीसाठी संत्र्याला राजाश्रय मिळायला हवा, असे मत कृषी समृद्धी उत्पादक कंपनीचे सचिव रवी पाटील यांनी ‘लोकसत्ता’शी बोलताना व्यक्त केले.