मुंबई-पुण्यासह पश्चिम महाराष्ट्रात संत्री चढय़ा दराने विकली जात असली, तरी विदर्भात मात्र शेतकऱ्यांना बागांमधील संत्री रस्त्याच्या कडेला फेकण्याची वेळ आल्याचे विरोधाभासी चित्र आहे. दक्षिणेकडील खरेदीदार राज्यांमध्ये अकाली पावसामुळे निर्माण झालेली विपरित परिस्थिती, बांगलादेशने आयात शुल्कात केलेली १०० टक्के वाढ, गेल्या वर्षीच्या तुलनेत वाढलेले उत्पादन, अशा अनेक कारणांमुळे प्रथमत:च ही स्थिती उद्भवली आहे.
विदर्भात सुमारे १.५ लाख हेक्टर क्षेत्रावर संत्रीबागा आहेत. प्रामुख्याने अमरावती, नागपूर, अकोला आणि वर्धा या जिल्ह्यांमध्ये संत्र्याचे उत्पादन घेतले जाते. ऑक्टोबरमध्ये बाजारात येणाऱ्या आंबिया बहराच्या संत्र्याला दक्षिणेकडील राज्यातून त्याच्या आंबट-गोड चवीमुळे चांगली मागणी असते. याशिवाय, बांगलादेशातही या काळात येथून संत्री पाठवली जातात, पण गेल्या महिन्यात तामिळनाडूत झालेला अकाली पाऊस, वाहतुकीवर झालेला परिणाम आणि सोबतच बांगलादेशने आयात शुल्कात केलेली १०० टक्के वाढ यामुळे संत्र्याचे अर्थकारणच यंदा पार बिघडून गेले आहे. दरवर्षी विदर्भातून संत्र्याची सुमारे १५०० कोटी रुपयांची उलाढाल होते, यंदा मात्र संत्र्याची अवस्था मातीमोल झाली आहे.
गेल्या वर्षी संत्र्याला १५ रुपये किलोपर्यंत दर मिळाले होते. मात्र, यंदा चांगल्या प्रतीची संत्री केवळ ५ रुपये प्रतिकिलो दराने शेतकऱ्यांना विकावे लागत आहेत. गेल्या वर्षी हेक्टरी ८ ते ९ टन उत्पादन होते. ते यंदा १२ ते १५ टनांपर्यंत पोहोचले आहे. यंदा व्यापारी शेताकडे फिरकण्यासही तयार नाहीत. अलीकडच्या इतिहासात पहिल्यांदाच आंबिया बहराची संत्री मोठय़ा प्रमाणावर बाजारात आल्याने बिकट स्थिती निर्माण झाली आहे. भाजीपाल्यापेक्षाही कमी दर या फळाला मिळत आहेत. व्यापारी संत्री घेण्यास तयार नाहीत आणि वाहतुकीचा खर्च परवडत नाही, त्यामुळे नाईलाजाने शेतकऱ्यांना संत्री तोडून रस्त्याच्या कडेला फेकून द्यावी लागत आहेत, अशी माहिती संत्री उत्पादक शेतकरी आणि ‘आत्मा’चे माजी सदस्य मोहन पावडे यांनी दिली.
या भागात संत्र्यावर प्रक्रिया करणारे उद्योग नाहीत. त्यामुळे शेतकऱ्यांना व्यापाऱ्यांवर विसंबून रहावे लागते. यंदा तर जादा उत्पादनाने मोठे संकट निर्माण केले आहे. पुणे, मुंबईत संत्री ४० ते ५० रुपये प्रतिकिलो दराने विकली जात असताना विदर्भात मात्र, शेतकऱ्यांना ती रस्त्यावर फेकण्याची वेळ आली आहे. हंगाम पूर्णपणे वाया गेला आहे, असे पावडे म्हणाले. सिंचनाअभावी या भागात मृग बहराची संत्री घेण्याचे प्रमाण कमी झाले आहे. आंबिया बहराकडे कल वाढला आहे. त्यामुळे एकाच वेळी मोठय़ा प्रमाणावर बाजारात संत्री आल्याने ही स्थिती उद्भवली आहे, अशी माहिती कृषी विभागातील सूत्रांनी दिली.

संत्र्याला राजाश्रय हवा -डॉ. बोंडे
संत्र्याला आता कुठे राजाश्रय मिळू लागला आहे. यंदा संत्र्याचे उत्पादन ५ पट अधिक झाले आहे, त्यामुळे दराच्या बाबतीत मोठी तफावत दिसून येत आहे, पण संत्र्याला भविष्यात नक्कीच चांगले दिवस येतील. अमरावती जिल्ह्यातील पथदर्शी संत्रा प्रक्रिया आणि निर्जलीकरण प्रकल्पाच्या माध्यमातून चांगले दिवस येतील. संत्र्याला बाजारपेठ मिळवून देणे गरजेचे आहे, असे मत मोर्शीचे भाजप आमदार डॉ. अनिल बोंडे यांनी व्यक्त केले.