प्रशांत देशमुख

जिल्हानिहाय राजकीय सुभेदारांची राज्य पातळीवर बांधलेली मोट म्हणजे राष्ट्रवादी काँग्रेस अशी टीका काँग्रेसकडून व्हायची. प्रत्येक जिल्हय़ात राष्ट्रवादी काँग्रेसचा शिक्का लावणारा नेता प्रामुख्याने सहकार गटातील राहिला. हे सर्व सुभेदार आता महागळतीच्या पार्श्वभूमीवर चर्चेत आले आहे. परंतु ही गळती विदर्भ वगळता उर्वरित महाराष्ट्रात प्रामुख्याने झाली व होत आहे. विदर्भातील काही ठरावीक नेते वगळता अन्य नेत्यांची पवारनिष्ठा अद्याप  कायम आहे.

विदर्भात राष्ट्रवादीला कधीच बाळसे धरता आले नाही. काही अपवाद वगळता विदर्भात पक्ष तेवढा वाढला नाही. ही खंत शरद पवार यांनीही अनेकदा बोलून दाखविली.  आघाडीच्या राजकारणात या नेत्यांचे काँग्रेससोबत नेहमीच वाजले. आता पक्षाच्या उतरत्या काळात काँग्रेससोबत भांडणे कमी झाली असली तरी काही जिल्हय़ातील नेते काँग्रेसलाच अद्याप विरोधक समजतात. तरीही पक्ष सोडून कोणीही युतीकडे धाव घेतली नाही. सत्तेच्या १५ वर्षांच्या काळात पक्षातील विदर्भातल्या नेत्यांकडे सातत्याने दुर्लक्ष झाल्याची भावना होती. सत्तेतच नव्हे तर संघटनेतही वैदर्भीय नेत्यांना वाव नव्हता. मात्र आज हेच सर्व नेते पवारांच्या पाठीशी भक्कम उभे असल्याचे चित्र पक्षाच्या पश्चिम महाराष्ट्रातील नेत्यांना आश्चर्याचे वाटते. पवारांना सोडून जाणारा एकमेव नेता म्हणून दत्ता मेघेंचा उल्लेख होतो. आता गळतीच्या काळात काही नेत्यांची नावे चर्चेत आली. यवतमाळ जिल्हय़ातील आमदार मनोहर नाईक हे शिवसेनेच्या वाटेवर असल्याची जोरदार चर्चा होती. पण त्यांचे बारगळल्यातच जमा आहे. याच जिल्हय़ातील आमदार ख्वाजा बेग व माजी आमदार संदीप बाजोरिया पक्षातच आहे. अमरावती जिल्हय़ात माजी आमदार हर्षवर्धन देशमुख, वसुधा देशमुख, सुरेखा ठाकरे, सुलभा खोडके, दिलीप इंगोले व वऱ्हाडे परिवार पवारांबरोबर आहे. बुलढाणा जिल्हय़ात माजी मंत्री राजेंद्र शिंगणे अद्याप निष्ठा धरून आहेत. वाशीम जिल्हय़ात माजी मंत्री सुभाष ठाकरे व जि.प. नेते पांडुरंग ठाकरे पक्षाचा तंबू सांभाळून आहेत. अकोला जिल्हय़ात कोरपे व धोत्रे परिवार तसेच माजी आमदार सुहास तिडके पवारांसोबत आहेत. चंद्रपूर जिल्हय़ात बाबासाहेब वासाडे, राजेंद्र वैद्य, गड्डमवार, माजी आमदार सुदर्शन निमकर, मोरेश्वर टेंभुर्णे, बाळासाहेब साळुंखे, माजी नगराध्यक्ष धुन्नू महाराज, रमेश कोतपल्लीवार सोबतच आहेत. गडचिरोली जिल्हय़ात धर्मरावबाबा आत्राम व सुरेश पोरेड्डीवार, भंडारा जिल्हय़ात प्रफुल्ल पटेल, राजेंद्र जैन पक्षाचा झेंडा फडकवत आहेत. वध्रेत माजी आमदार प्रा. सुरेश देशमुख व राजू तिमांडे, दिलीप काळे, सुधीर कोठारी यांनी पवारनिष्ठा जपली.

पुढची पिढी विरोधकांकडे?

नेते पक्षात पण पुत्र विरोधकांकडे अशी मोजकी उदाहरणे आहेत. वर्धा शहराकतील देशमुख यांचे पुत्र समीर देशमुख यांनी शिवबंधन बांधले. चंद्रपुरातील संदीप गड्डमवार भाजपच्या वाटेवर असल्याची चर्चा आहे. नागपुरात सलील देशमुख सेनेच्या वाटेवर असल्याची कुजबुज होते. नागपुरातील मेळाव्यात ते गैरहजर होते. मात्र सलिल पक्षातच राहणार असल्याचा खुलासा अनिल देशमुख यांनी श्रेष्ठींजवळ केला. ही सर्व मंडळी सत्तेसाठी भाजप किंवा सेनेकडे गेली नाही. त्यामागचे प्रमुख कारण म्हणजे विदर्भात भाजप बहुतांश जिल्हय़ात प्रबळ असल्याचे सांगितले जाते. सेनेत प्रवेश केल्यास मुंबईस्थित नेत्यांशी समन्वय साधण्यात अडचण येते. म्हणून राष्ट्रवादीतच राहिलेले बरे, अशी भावना या नेत्यांबाबत व्यक्त होते. भाजपला पश्चिम महाराष्ट्रात आधार नसल्यानेच त्यांनी राष्ट्रवादी काँग्रेसच्या नेत्यांना घेतले. विदर्भात पक्ष मजबूत असल्याने त्यांना आयात करायचे कारणच काय, असा सवाल एका भाजप नेत्याने केला.

सातत्याने सत्तेत राहणाऱ्या उर्वरित महाराष्ट्रातील काही नेत्यांना सत्तेवाचून राहणे अशक्य ठरते. सत्ता हाच त्यांचा राजकारणाचा आधार आहे. विदर्भात तसे नाही. पवारांनी कधीकाळी दिलेला दिलासा वैदर्भीय नेत्यांना पुरेसा ठरला. म्हणून विदर्भातील प्रत्येक जिल्हय़ात पक्षाचे उमेदवार उभे करण्याची ताकद कायम राहिली.

– राजेंद्र वैद्य, राष्ट्रवादी नेते

विदर्भातील नेतेमंडळी सत्ताकाळात दुर्लक्ष होऊनही पक्षासोबतच आहे. कारण हे सर्व नेते पवारांशी मनाने जुळले आहेत. पश्चिम महाराष्ट्रात सत्तेसाठी प्रत्येक जिल्हय़ात मोठी चुरस असल्याने पवारनिष्ठा पातळ झाली असावी.

– किशोर माथनकर, प्रदेश पदाधिकारी