मरकडा पर्यटन विकासाचा आराखडा तयार, पाच कोटींचा निधी

विदर्भाची काशी समजल्या जाणाऱ्या मरकडा येथील प्राचीन वास्तुशिल्पकला असलेल्या शिवमंदिराची फार मोठी हानी होत असल्याने ५ कोटींचा निधी खर्च करून मरकडा पर्यटनस्थळाचा विकास करण्यात येणार आहे. मरकडा पर्यटन विकासाचा आराखडा तयार करण्यात आला असून त्यानुसारच काम होणार आहे.

महाराष्ट्रात अजिंठा, वेरूळप्रमाणेच गडचिरोली जिल्ह्य़ात मरकडादेव येथे प्राचीन संस्कारांची फार मोठी नोंद शिल्पकलेच्या रूपाने आजही दिसत आहे. त्या स्थळाची भव्यता लक्षात घेता एकेकाळी वैभवशाली इतिहास, दिव्य संस्कृती आणि संपन्न कलाविलास नांदत आजही दिमाखाने वैनगंगेच्या उत्तरवाहिनी पश्चिम तीरावर वैभवाने उभा आहे. त्या स्थानाकडे भारतीय पुरातत्व खात्याचे फार दुर्लक्ष झाल्याने शिल्पकलेची फार मोठी हानी झालेली आहे. आता तरी त्याकडे आपणाकडून अनेक सुधारणांची अपेक्षा आहे. हा अनमोल ठेवा सुरक्षित व्हावा. भावी पिढय़ांना आपल्या संस्कृतीची जाणीव व्हावी, ती जपल्या जावी म्हणून सरकार दरबारी योग्य त्या मापदंडाने त्यास न्याय मिळवून द्यावा, अशी भक्तांची मागणी आहे, परंतु या मंदिराकडे शासनाचे पूर्णत: दुर्लक्ष झाले आहे.

मरकडादेव येथील शिल्पकला स्त्री प्रतिमांसाठी जगविख्यात आहे. स्त्रियांचे नाना श्रृंगार बघून थक्क व्हावे लागते. श्रृंगाराच्या अनेक तऱ्हा पाहतांना विसर पडतो. कुणी चेंडू खेळतांना, कुणी प्रियकराला पत्र लिहितांना, नृत्यासाठी पायात नुपुरे बांधतांना स्त्रियांच्या शृंगारांच्या नाना तऱ्हा पहावयास मिळतात. नृत्यासाठी संगीतकारही आपल्या अनेक वाद्यवृदांची चुणूक दाखवतांना दिसतात. तपस्वी तपश्चर्येत मग्न दिसतात. शिवपार्वतीच्या अनेक तऱ्हा येथे पाहावयास मिळतात. शिवतांडव, सूरवर्धन अतिशय देखणे दिसते.

गजलक्ष्मी, सदाशिव विलक्षणा आदींच्या मूर्ती बघून थक्क होते. येथे खजुराहोसारखे व्याल खोबणीत कोरलेले दिसतात. नग्न भरवही दाखवले आहेत. मुख्य मंदिरातील कलाविलास देखणा, अत्यंत मोहक, चित्ताकर्षक दिसतो. मूर्तीकला गुळगुळीत दिसते. प्रत्येक मूर्ती अलंकाराने लदबदलेली दिसते. कलावंतांच्या कलेची लयलूट, कलेतील निस्नातपणा मनाला थांबायला भाग पाडतो. काही दुर्मीळ मूर्ती अशा आहेत त्या मरकडा येथील शिल्पातच दिसतात.

जागतिक किर्तीची ही शिल्प प्रदर्शनी भावी पिढय़ांसाठी जपणे अगत्याचे आहे, परंतु मंदिराची सध्याची अवस्था अत्यंत वाईट आहे. या सर्व गोष्टी लक्षात घेऊन आमदार डॉ. देवराव होळी यांनी मरकडा पर्यटन विकासासाठी राज्य शासनाकडे निधीची मागणी केली होती. त्यानुसार राज्य शासनाने मरकडा विकासासाठी ५ कोटीचा निधी तात्काळ उपलब्ध करून दिला आहे.

मरकडाला महाराष्ट्र शासनाने पर्यटनाचा ब दर्जा दिलेला आहे. त्यानुसारच या पर्यटन स्थळाचा विकास होणार आहे. मरकडा येथे पोचमार्गावर ८६ लाख, टॅक्सी वाहनतळ व सुविधा बांधकामासाठी ३२ लाख, रिसॉर्ट कॉटेज इमारत ९९.१९ लाख, पिण्याच्या पाण्याच्या सुविधेसाठी ९.१५ लाख, निरीक्षण मनोरा बांधकाम ४१.५४ लाख, सुलभ शौचालय १९.९० लाख, जाहिरात पोर्टल, गेट सुरक्षा बांधकामासाठी ८.६७ लाख, भूमिगत गटार व फुटपाथसाठी ९७ लाख, पाण्यातील खेळ व नौकाविहार १.६० लाख व इतर कामांसाठी ५ लाख, असे ५ कोटींच्या कामांचे नियोजन करण्यात आले आहे. विशेष म्हणजे, यापैकी काही रक्कम ही सार्वजनिक बांधकाम विभागाला प्राप्त झालेली आहे. पुरातत्व विभागानेही मरकडा विकासाची दखल घेतली असल्याने मरकडा तीर्थक्षेत्र व पर्यटन क्षेत्र म्हणून जगाच्या नकाशावर स्थान मिळवेल, अशी आशा व्यक्त केली जात आहे.