एखाद्या गोष्टीचा निषेध करण्यासाठी आंदोलक कोणत्या मार्गाचा वापर करतील याचा नेम नसतो. याच गोष्टीचा प्रत्यय बुलढाण्यातील सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात आला. याठिकाणी आंदोलकांनी सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्यालयात चक्क नागीण डान्स करून आपला निषेध व्यक्त केला. या घटनेचा व्हिडिओ सध्या सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. या परिसरातील छत्रपती शिवाजी मार्केटमधील रस्त्याची दुरावस्था झाली आहे. त्यामुळे नागरिकांकडून या रस्त्याची डागडुजी करण्याची मागणी गेल्या अनेक दिवसांपासून केली जात होती. मात्र, सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधिकारी या मागणीकडे ढुंकूनही पाहत नव्हते. अखेर अधिकाऱ्यांच्या उदासीन वृत्तीला कंटाळलेल्या आंदोलकांनी अभिनव पद्धतीने आपला निषेध व्यक्त केला. यावेळी साधारण दहा आंदोलक सार्वजनिक बांधकाम विभागाच्या कार्य़ालयात आले आणि त्यांनी नागीण डान्स करायला सुरूवात केली. आंदोलकांचा हा पवित्रा पाहून सरकारी अधिकाऱ्यांकडे त्यांच्याकडे पाहत बघण्याशिवाय गत्यंतर उरले नव्हते. अखेर पोलिसांनी हस्तक्षेप करत आंदोलकांना कार्यालयातून बाहेर काढले. मात्र, निषेधाची ही अभिनव पद्धत सोशल मिडीयावर व्हायरल झाली आहे.