मटकीच्या उसळीत चिकनचे तुकडे आढळल्याचा धक्कादायक प्रकार समोर आला आहे. विशेष म्हणजे विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये हा प्रकार घडला आहे. सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांना जेवताना मटकीच्या उसळीत हे चिकनचे तुकडे आढळले. सध्या विधीमंडळाचं पावसाळी अधिवेशन सुरु असल्याने विधानभवनाच्या कॅन्टिनमध्ये चांगलीच गर्दी असते. त्यात हा प्रकार घडल्याने खळबळ उडाली आहे.
सहकार विभागातील अधिकारी मनोज लाखे यांनी कॅन्टिनमध्ये मटकीच्या उसळची थाळी मागवली होती. यावेळी उसळमध्ये त्यांना चिकनचे तुकडे आढळले. मनोज लाखे यांनी विधानसभा सचिव जितेंद्र भोळे यांच्या निदर्शनास हा प्रकार आणून दिला असून तक्रार केली आहे. कंत्राटदाराचा निष्काळजीपणा यासाठी कारणीभूत असल्याचा आरोप त्यांनी केला आहे.
मनोज लाखे यांनी याप्रकऱणी कारवाई कऱण्याची मागणी केली आहे. विधीमंडळाच्या पावसाळी अधिवेशनामुळे कॅन्टिनमध्ये आमदार, नेते, पोलीस आणि पत्रकारांची चांगलीच गर्दी असते. त्यातच हा प्रकार घडल्यामुळे खळबळ उडाली आहे. दरम्यान कॅन्टिंग पर्यवेक्षक रविंद्र नागे यांनी झालेल्या प्रकाराबद्दल मनोज लाखे यांची माफी मागितली. जाणुनबुजून हे घडलेलं नाही असं स्पष्टीकरण त्यांनी दिलं आहे.
First Published on June 19, 2019 7:25 pm