बॉलिवूडची अभिनेत्री कंगना रणौतविरोधात विधानपरिषदेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला. काँग्रेसचे नेते आणि विधानपरिषद सदस्य भाई जगताप यांनी सभागृहात हा प्रस्ताव मांडला. यापूर्वी शिवसेनेकडून रिपब्लिक टीव्हीचे संपादक अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही विधानसभेत हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. त्यानंतर विरोधकांनी सभागृहात गोंधळ घातला होता. दरम्यान, गोंधळानंतर काही वेळासाठी विधानसभेचं कामकाज तहकूब करण्यात आलं होतं. त्यानंतर भाई जगताप यांनी विधानपरिषदेत कंगना रणौतविरोधात हक्कभंग प्रस्ताव मांडला.
“हा हक्कभंग केवळ हक्कभंग नसून ती मुंबई महाराष्ट्राशी कंगना रणौतनं केलेली गद्दारी आहे याचा उल्लेख करावासा वाटेल. २०१६ मध्ये कंगना रणौतच्या बाबतीत अध्ययन सुमन याला कोकेन घेण्यास सांगत होती असं त्यानंच सांगितलं होतं. अशी महिला आपल्या मुंबईबद्दल बोलते त्यामुळे हक्कभंग आणला आहे. याबाबतीत आमच्याकडे सर्व पुरावे आहेत,” असं भाई जगताप यावेळी म्हणाले.
आणखी वाचा- विधिमंडळात अर्णब गोस्वामी यांच्याविरोधात हक्कभंग प्रस्ताव
अर्णब गोस्वामींविरोधातही हक्कभंग
यापूर्वी विधानसभेत अर्णब गोस्वामी यांच्याविरोधातही हक्कभंग प्रस्ताव मांडण्यात आला होता. “अर्णब गोस्वामी हेतुपुरस्सर बोलत आहेत. सुशांत सिंह मृत्यूप्रकरणाशी नेत्यांचा काहीही संबंध नाही. ते कपोलकल्पित बोलून स्वातंत्र्याच्या नावाखाली दिशाभूल करत आहेत. रिपब्लिक टीव्ही ही वृत्तवाहिनी बंद करण्यात यावी,” अशी मागणी सरनाईक यांनी प्रस्ताव मांडताना केली. “अर्णब गोस्वामी हे न्यायाधीशआंच्या भूमिकेत आले असून स्वत: खटला चालवत आहेत. तेच निकालही देत आहेत,” असं म्हणत परिवहन मंत्री अनिल परब यांनी हल्लाबोल केला. “भारतरत्न डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांनी लिहिलेल्या राज्यघटनेनुसार प्रसारमाध्यमांना चौकट आखून देण्यात आली आहे. अर्णब गोस्वामी हे स्वत:ला न्यायाधीश समजतात का? ते सुपारी घेऊन काम करतात. त्यांना शिक्षा झाली पाहिजे. पत्रकार संरक्षण कायदा आणला म्हणून त्यांनी काहीही करावं का?,” असा सवालही त्यांनी केला.
लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.
First Published on September 8, 2020 2:37 pm