विधान परिषदेच्या पदवीधर व शिक्षक मतदारसंघांत अनपेक्षितपणे भाजपाला मोठा फटका बसला आहे. नागपूर आणि पुणे या भाजपने प्रतिष्ठेच्या केलेल्या पदवीधर मतदारसंघांमध्ये महाविकास आघाडीच्या उमेदवारनं विजय मिळवला आहे. पुणे मतदारसंघात तब्बल २० वर्षांनंतर भाजपाला पराभवाचं तोंड पाहवं लागलं आहे. नेहमी भाजपाला साथ देणाऱ्या पुणेकर मतदारांनी यंदा राष्ट्रवादीच्या पारड्यात मतं टाकून भाजपाच्या गडाला खिंडार पाडलं आहे. दरम्यान, यानंतर राष्ट्रवादी नेते रोहित पवार यांनी विरोधकांवर जोरदार निशाणा साधला.

“भाजपसाठी ही निवडणूक प्रतिष्ठेची असली तरी महाविकास आघाडीसाठी निष्ठेची होती. राष्ट्रवादी काँग्रेस,काँग्रेस व शिवसेनेसह सहयोगी पक्षांच्या तळागाळातील कार्यकर्त्यांनी एकमेकांबद्दल दाखवलेली निष्ठाच आज कामी आली. या निवडणुकीत जनतेने महाविकास आघाडीची मनातील जागा कायम ठेऊन भाजपला त्यांची ‘जागा’ दाखवून दिली,” अशी प्रतिक्रिया रोहित पवार यांनी दिली. त्यांनी ट्विटरच्या माध्यमातून आपली प्रतिक्रिया दिली. भाजपाचे म्हणवल्या जाणाऱ्या नागपूर, पुण्यासारख्या बुरुजालाही सुरुंग लावत इथं महाविकास आघाडीने विजयाचा झेंडा रोवला. त्यामुळं आतातरी भाजपानं खऱ्या अर्थाने विरोधी पक्ष म्हणून प्रामाणिकपणे काम करण्यास सुरुवात करायला हरकत नसल्याचं ते म्हणाले.

आणखी वाचा- … हा तर मतदारांनी आमच्यावर दाखवलेला विश्वास : सुप्रिया सुळे

पुणे पदवीधर मतदार संघात एक लाख २२ हजार १४५ अशी सर्वाधिक मते घेत महाविकास आघाडीचे अरुण लाड विजयी झाले आहेत. भाजपाच्या संग्राम देशमुख यांना ७३ हजार ३२१ मते पडली आहेत. विजयासाठी एक लाख १५ हजार मतांचा कोटा निश्चित करण्यात आला होता.

नागपूरमध्येही भाजपाला धक्का

विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांचा बालेकिल्ला समजला जाणारा नागपूर पदवीधर मतदारसंघातही भाजपाला धक्का बसला आहे. पहिल्या पाचही फेरीमध्ये भाजपाची पिछेहाट आहे. महाविकास आघाडीनं भाजपाच्या गडाला सुरुंग लावत जोरदार मुसंडी मारली आहे. नागपूर मतदार संघात अभिजित वंजारी यांचा विजय झाला आहे. वंजारी यांनी पहिल्या फेरीपासूनच आघाडी घेतली होती. भाजपाचे संदीप जोशी हे दुसऱ्या क्रमांकावर राहिले.

आणखी वाचा- सर्व पक्षांच्या एकजुटीचा हा विजय- अजित पवार

औरंगाबादमधूनन सतीश चव्हाण यांची विजयाची हॅटट्रिक

औरंगाबाद पदवीधर मतदारसंघातून सलग दोन वेळा विजयी ठरलेले राष्ट्रवादी काँग्रेसचे उमेदवार सतीश चव्हाण यांनी विजयाची हॅटट्रिक साधली आहे. महाविकास आघाडीचे सतीश चव्हाण पुन्हा एकदा विजयी झाले आहेत. सतीश चव्हाण यांना तब्बल ११६६३८ मते मिळाली आहेत. तर भाजपाच्या शिरीष बोराळकर यांना ५८७४३ मतांवर समाधान मानावं लागलं आहे.