उस्मानाबाद-लातूर-बीड विधानपरिषदेचा निकाल हा धनशक्तीच्या विरोधातील विजय आहे, अशी विजयानंतरची प्रतिक्रिया सुरेश धस यांनी दिली आहे. प्रलोभने दाखवत राष्ट्रवादीने ही निवडणूक जिंकण्याचा प्रयत्न केला असा आरोप करीत, साम-दाम-दंड भेद कोणाचा होता हा निर्णय जनतेने घ्यावा असेही धस यांनी म्हटले आहे.

धस म्हणाले, घड्याळ घातलेल्या हातांनी मला मदत केली. आम्ही आमच्या नेत्यांसह तिन्ही जिल्ह्यांत फिरलो. आमच्या या टीम वर्कमुळेच विजय झाला आहे. तर ऱाष्ट्रवादीकडून मतदारांना स्मार्टवॉच आणि आयफोनचे वाटप करण्यात आले. तसेच महागडे किचेनही वाटण्यात आले. त्यामुळे यापुढे राष्ट्रवादीने स्मार्टवॉच आणि आयफोन हे आपले चिन्ह ठेवावे, अशी कोटीही त्यांनी केली आहे.

राष्ट्रवादीने पक्षातील तोडपाणी करणाऱ्यांवर नजर ठेवावी. तुमची नवरी मंडपातून पळून गेली त्यानंतर दुसरी आणली, त्यामुळे राष्ट्रवादीला काँग्रेसने आम्हाला मदत केली नाही असा आरोप करण्याचा अधिकार नाही, असा टोलाही त्यांनी हाणला आहे. तर, धनंजय मुंडेंबाबत विचारण्यात आल्यानंतर ‘बाप बाप होता है, बेटा बेटा होता है’ अशा स्वरूपात त्यांनी धनंजय मुंडेंवर निशाणा साधला.

तसेच काँग्रेसचे उमेदवार अशोक जगदाळे प्रतिक्रिया देताना म्हणाले, उस्मानाबाद जिल्ह्यात काँग्रेसने राष्ट्रवादीचा विश्वास घात केला. आघाडीचा धर्म पाळू असे त्यांनी म्हटले मात्र, एकाबाजूने खेळले. उलट राष्ट्रावीदीने माझ्या बाजूने पूर्णपणे ताकद लावली.