News Flash

जिल्ह्य़ात १२ जागांसाठी  ११६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात

आज सर्व मतदारसंघातुन ६६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले.

संग्रहित छायाचित्र

परजणे, वहाडणे यांची बंडखोरी, नागवडे, झावरे, कार्ले यांची माघार

विधानसभेचे निवडणुकीसाठी आज, सोमवारी उमेदवारी अर्ज मागे घेण्याच्या अखेरच्या दिवशी जिल्ह्यातील १२ जागांसाठी एकुण ११६ उमेदवार निवडणूकीच्या रिंगणात राहिल्याचे स्पष्ट झाले. आज सर्व मतदारसंघातुन ६६ उमेदवारांनी आपले अर्ज मागे घेतले. सर्वाधिक उमेदवार नेवासा मतदारसंघात १७, तर सर्वात कमी मतदार अकोल्या, ४ राहीले आहेत. भाजपचे नेते व मंत्री राधाकृष्ण विखे यांचे मेहुणे राजेश परजने तसेच नगराध्यक्ष विजय वहाडणे यांची बंडखोरी कायम राहीली. उर्वरित मतदारसंघातील बहुसंख्य बंडखोर, नाराजांनी आपली उमेदवारी मागे घेतली. मात्र त्यासाठी भाजप व शिवसेनेच्या पदाधिकाऱ्यांना मोठीच धावपळ करावी लागली. भाजपबरोबरच काँग्रेस व राष्ट्रवादीमधील नाराजांचे अर्ज मागे घेतले जावेत यासाठी भाजपचे खा. डॉ. सुजय विखे यांनी अनेक ठिकाणी महत्वाची भुमिका बजावली.

जिल्ह्य़ातील बारा विधानसभा मतदारसंघांमध्ये एकुण २०२ उमेदवारांनी अर्ज दाखल केले होते. छाननीनंतर उमेदवारी अर्ज मागे घेणे, त्यानंतर लगेच निवडणूक चिन्हांचे वाटप आदी प्रक्रिया पार पडली. मतदारसंघनिहाय उमेदवारी अर्ज मागे घेतलेल्या उमेदवारांची संख्या अशी: अकोले 2, संगमनेर 3, शिर्डी, ५, कोपरगाव ८, श्रीरामपुर २१, नेवासा ३, शेवगाव ७, राहुरी ५, पारनेर ३, नगर शहर २, श्रीगोंदा ५, कर्जत-जामखेड ४, अशा एकूण ६६ जणांनी माघार घेतली.

निवडणूकीच्या रिंगणात मतदारसंघनिहाय अनेक उमेदवार असले तरी बहुसंख्य ठिकाणी दुरंगी किंवा तिरंगी लढती होणार आहेत. बहुजन वंचित आघाडीने ११ जागांवर तर एमआयएमने एका, नगर शहरातील जागेवर उमेदवार उभा केला आहे.

भाजप-शिवसेना युतीसह काँग्रेस-राष्ट्रवादी आघाडीमध्येही बंडखोरांनी व नाराजांनी अर्ज दाखल केले होते. पारनेरमध्ये जिल्हा परिषदेचे माजी उपाध्यक्ष व राष्ट्रवादीचे सुजित झावरे, भाजपचे माजी जिल्हा परिषद सदस्य वसंत चेडे, शिवसेनेचे जिल्हा परिषद सदस्य संदेश कार्ले यांनी अर्ज मागे घ्यावेत, यासाठी खा. विखे यांनी प्रयत्न केले. शेवगाव मतदारसंघातील जिल्हा परिषद सदस्य, भाजपच्या हर्षदा काकडे व पाथर्डी भाजयुमोचे तालुकाध्यक्ष अमोल गर्जे यांनी माघार घेतली, श्रीरामपूरमधून शिवसेनेचे खा. सदाशिव लोखंडे यांचे सुपुत्र डॉ. चेतन लोखंडे यांनी कालच माघार घेतली, कोपरगावमध्ये मात्र नगराध्यक्ष विजय वहाडणे तसेच मंत्री विखे यांचे मेहुणे, जिल्हा परिषद सदस्य राजेश परजणे यांनी आपली उमेदवारी कायम ठेवत बंडखोरी केली आहे. या दोघांनीही भाजपकडे उमेदवारीची मागणी केली होती. नगराध्यक्ष निवडणूकीनंतर वहाडणे यांची पक्षातुन हकालपट्टी केल्याचे भाजपने जाहीर केले होते. मात्र स्वत: वहाडणे मात्र आपण भाजपमध्येच आहोत, असे सांगतात.

श्रीगोंद्यातुन भाजपच्या वाटेवर असलेल्या काँग्रेसच्या जि.प. सभापती अनुराधा नागवडे, विखे यांच्या समवेत भाजपमध्ये प्रवेश करणारे काँग्रेसचे जिल्हाध्यक्ष आण्णासाहेब शेलार यांनीही माघार घेतली, त्यासाठी खा. विखे यांनी प्रयत्न केले.

मतदारसंघनिहाय उमेदवार

जिल्ह्यातील बारा मतदारसंघापैकी सर्वाधिक उमेदवार नेवासे मतदारसंघात तर सर्वात कमी उमेदवार अकोल्यात निवडणूक रिंगणात आहेत. मतदारसंघनिहाय रिंगणातील उमेदवार असे: नगर शहर १२, अकोले ४, संगमनेर ८, शिर्डी ५, कोपरगाव १४, श्रीरामपूर ११, नेवासा १७, शेवगाव ९, राहुरी ७, पारनेर ६, श्रीगोंदा ११, कर्जत-जामखेड १२, असे एकूण ११६ उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात उभे आहेत. रिंगणातील उमेदवारांची संख्या मोठी असली तरी ५ मतदारसंघात सरळ लढत होणार आहेत तर उर्वरित ठिकाणी तिरंगी ते दुरंगी लढती होणार आहेत. भाजप ८, शिवसेना ४, राष्ट्रवादी ९ तर काँग्रेस ३ जागा लढवत आहे.

नेवाश्यात अतिरिक्त यंत्राची गरज

मतदान यंत्राच्या बॅलेट युनिटवर जास्तीत जास्त १५ उमेदवारांची व नोटा अशी एकुण १६ नावे सामावली जातात. केवळ नेवासा मतदारसंघात उमेदवारांची संख्या अधिक आहे. तेथे १७ उमेदवार रिंगणात आहेत. त्यामुळे ‘नोटा’चे चिन्ह धरुन एकुण १८ नावे होतात, त्यामुळे नेवासे मतदारसंघात एका अतिरिक्त यंत्राची गरज भासणार आहे. इतर सर्व मतदारसंघात १६ पेक्षा कमी नावे असणार आहेत, तेथे अतिरिक्त यंत्राची गरज भासणार नाही. निवडणूक यंत्रणेने नेवाश्यासाठी उपाययोजना सुरु केली आहे.

लोकसत्ता आता टेलीग्रामवर आहे. आमचं चॅनेल (@Loksatta) जॉइन करण्यासाठी येथे क्लिक करा आणि ताज्या व महत्त्वाच्या बातम्या मिळवा.

First Published on October 8, 2019 2:59 am

Web Title: vidhan sabha election bjp minister akp 94
Next Stories
1 ‘पेड न्यूज’संदर्भात जिल्हा प्रशासन कठोर
2 बंडखोरी म्यान!
3 अमित घोडा यांची नाटय़मयरित्या माघार!
Just Now!
X