प्रारंभी  २२० जागांचा दावा करणाऱ्या भाजप व शिवसेनेने मागील पंधरा दिवसांमध्ये यावर बोलण्याचे सोडले असून त्यांना पराभव दिसत आहे. जनता त्यांच्या भूलथापांना कंटाळली असल्याने यावेळेस काँग्रेस—राष्ट्रवादी आघाडीचे सरकार सत्तेवर येणार असून मुख्यमंत्री आघाडीचाच होईल असा  विश्वास काँग्रेसचे प्रदेशाध्यक्ष आमदार बाळासाहेब थोरात यांनी व्यक्त केला आहे.

आमदार थोरात म्हणाले की, सरकारने मागील पाच वर्षांत पूर्णत: भ्रमनिरास केला आहे. निवडणुकीपूर्वी घोषणा केल्या, जाहिरातबाजी केली आणि जनतेवर खोटे नाटे बिंबवण्याचा प्रयत्न केला. परंतु भावनिक मुद्दय़ांना यावेळेस जनता बळी पडणार नसल्याने त्यांचा पराभव अटळ आहे. सुरुवातीला २२० चा नारा देणारे मागील पंधरा दिवसांमध्ये त्याबाबत शब्द बोलायला तयार नाहीत. राज्यातील फसलेली कर्जमाफी, बंद पडत चाललेली कारखानदारी, वाढलेली बेरोजगारी यावर न बोलता ३७० सारखे भावनिक मुद्दे करून राजकारण करण्याचा भाजपने प्रयत्न केला. मात्र यामध्ये त्यांना यश आले नाही. काँग्रेस हा कधीही न संपणारा पक्ष असून तो आता नव्या जोमाने उभा राहिला आहे. ज्यांनी काँग्रेस सोडली त्यांच्या जागेवर नवीन तरुण तयार झाले आहेत. त्यामुळे नवी काँग्रेस आगामी काळात दिसणार आहे ज्येष्ठ नेते शरद पवार हे महाराष्ट्रातील एक आदरणीय व्यक्तिमत्त्व आहे.  मात्र भाजप सेना सरकारने सुडाचे राजकारण केले. हे  जनतेला भावले नाही. म्हणून संपूर्ण महाराष्ट्र सरकारच्या विरोधात असून काँग्रेस आघाडी मोठय़ा मताधिक्याने निवडून येणार आहे आणि काँग्रेसचाच मुख्यमंत्री होणार आहे, असा विश्?वास व्यक्त करताना यांनी पक्ष सोडला. त्यांनी आता काँग्रेसची काळजी करू नये असा टोलाही त्यांनी विरोधकांना लगावला.